Noor Khan Airbase: भारताने उद्ध्वस्त केलेल्या पाकिस्तानी एअरबेसवरच उतरली अमेरिकन विमाने; नेमकं कारण काय? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
US control Nur Khan base : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आलेल्या प्रचंड पुरामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत, पिके वाहून गेली आहेत आणि अनेकांच्या उपजीविकेचा पाया कोसळला आहे. ही आपत्ती इतकी भीषण आहे की पाकिस्तानला पुन्हा एकदा बाहेरच्या जगासमोर मदतीची याचना करावी लागली आहे. या मदतीसाठी अमेरिकेने हात पुढे केला असून, तिची लष्करी विमाने पाकिस्तानात उतरली आहेत. पण विशेष म्हणजे ही विमाने त्याच नूर खान हवाई तळावर उतरली, ज्याला काही महिन्यांपूर्वी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत उद्ध्वस्त केले होते.
पंजाब प्रांतात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. सिंध सरकारचा अंदाज आहे की पंजाबमधून सिंधमध्ये प्रवेश करणाऱ्या पुराच्या लाटांमुळे १६ लाखांहून अधिक लोक प्रभावित होऊ शकतात. हजारो घरं पाण्याखाली गेली आहेत, शेतकरी हातातोंडाशी आलेली पिकं गमावून हवालदिल झाले आहेत. लाखो लोकांना तात्पुरत्या छावण्यांमध्ये आसरा घ्यावा लागत आहे. या संकटाच्या छायेत पाकिस्तानची प्रशासनिक आणि आर्थिक हतबलता पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. स्वबळावर आपत्तीचा सामना करण्याऐवजी पाकिस्तानला परदेशी मदतीवर अवलंबून राहावे लागले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेचे उत्तर कोरियामधील सिक्रेट मिशन उघड; तब्बल 6 वर्षांपासून लपवले गेले होते ‘इतके मोठे सत्य’
पाकिस्तानच्या सैन्याने मदतीची विनंती केली होती. त्यावरून अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (US Arcent) अंतर्गत सहा लष्करी विमाने मदत साहित्य घेऊन पाकिस्तानात पोहोचली आहेत. या साहित्यामध्ये तात्पुरते तंबू, पाणी शुद्धीकरण यंत्रणा, जनरेटर आणि इतर अत्यावश्यक साधनांचा समावेश आहे.
रावळपिंडीतील नूर खान एअरबेसवर अमेरिकन विमानांची लँडिंग झाली. तिथे अमेरिकन अधिकाऱ्यांनी मदतीचा पहिला टप्पा औपचारिकपणे पाकिस्तानी सैन्याला सुपूर्द केला. अमेरिकन दूतावासाच्या उपप्रमुख नताली बेकर यांनी पुरामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल दुःख व्यक्त करताना म्हटले “या मानवतावादी संकटात आम्ही पाकिस्तानसोबत उभे आहोत.”
U.S. military aircraft delivered essential supplies at the request of the Pakistan military in response to the devastating floods. At Nur Khan Air Base, CDA Baker extended her deepest condolences to the people of Pakistan, whose lives have been uprooted by the widespread,… pic.twitter.com/60XFcQjShO
— U.S. Embassy Islamabad (@usembislamabad) September 6, 2025
credit : social media
पण या घडामोडीत सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे अमेरिकन विमाने त्या हवाई तळावर उतरली ज्याला भारताने काही महिन्यांपूर्वीच उद्ध्वस्त केले होते. मे महिन्यात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून रावळपिंडीच्या चकलालामधील नूर खान एअरबेसवर अचूक हवाई हल्ला केला होता. मॅक्सर टेक्नॉलॉजीजच्या उपग्रह प्रतिमांनुसार भारतीय हवाई दलाने धावपट्टी, हँगर आणि ७,००० चौरस फूट ऑपरेशनल कॉम्प्लेक्स पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते. एवढेच नव्हे तर पाकिस्तानच्या दोन लष्करी वाहनांचेही नुकसान झाले होते. हा तळ पाकिस्तानसाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा होता कारण तिथे AWACS विमाने, C-130 हरक्यूलिस आणि IL-78 टँकर सारखी संवेदनशील यंत्रणा तैनात होती. या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या हवाई संरक्षण आणि वाहतुकीच्या क्षमतेवर मोठा आघात झाला. परंतु आता या पुराच्या काळात असे दिसून आले की पाकिस्तानने धावपट्टी तातडीने दुरुस्त करून ती पुन्हा वापरासाठी खुली केली आहे.
या सगळ्या प्रकरणातून पुन्हा एकदा पाकिस्तानची खरी परिस्थिती जगासमोर आली आहे. एकीकडे भारतातील पंजाबनेही मुसळधार पावसाचा सामना केला, पण प्रशासनाने स्वतःच्या ताकदीवर परिस्थिती नियंत्रणात आणली. तर दुसरीकडे पाकिस्तानला अमेरिकेकडे हात पसरण्याशिवाय पर्याय उरला नाही. जगासमोर नेहमी स्वतःला सामर्थ्यवान दाखवणारा पाकिस्तान, संकटसमयी मात्र हातात भिक्षापात्र घेऊन फिरताना दिसतो. त्यामुळेच सोशल मीडियावरही अनेकांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या “पाकिस्तान फक्त बढाई मारतो, पण खरी वेळ आली की भीक मागतो.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अंधःकारमय इतिहासाची पुनरावृत्ती? चीनमध्ये परेड तर अमेरिकेत पेंटागॉनमध्ये धडाधड पिझ्झा ऑर्डर ‘हा’ जगासाठी धोक्याचा इशारा
नूर खान एअरबेसवरील अमेरिकन विमानांचे अवतरण हे केवळ मदतीचे दृश्य नाही, तर पाकिस्तानच्या दुहेरी वास्तवाचे प्रतीक आहे. एका बाजूला भारताने उद्ध्वस्त केलेला तळ आणि दुसऱ्या बाजूला त्याच तळावर उतरलेली मदतीची विमाने. या सगळ्या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे की पाकिस्तान अजूनही स्वतःच्या पायावर उभा राहण्यात अयशस्वी ठरत आहे.