डोनाल्ड ट्रम्पचे पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाझामधील शांततेसाठी झालेल्या ऐतिहासिक कराराबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या संभाषणाबाबत, पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, “माझे मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोललो आणि ऐतिहासिक गाझा शांतता योजनेच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.” पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, व्यापार चर्चेत झालेल्या चांगल्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. येत्या आठवड्यात जवळच्या संपर्कात राहण्यावर सहमती झाली.
‘भारताशी संबंध तात्काळ सुधारा, नाहीतर…’ ; अमेरिकन कॉंग्रेस खासदारांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा
कराराचे स्वागत केले
Spoke to my friend, President Trump and congratulated him on the success of the historic Gaza peace plan. Also reviewed the good progress achieved in trade negotiations. Agreed to stay in close touch over the coming weeks. @POTUS @realDonaldTrump — Narendra Modi (@narendramodi) October 9, 2025
गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पश्चिम आशियासाठीच्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर झालेल्या कराराचे स्वागत केले, ज्याअंतर्गत इस्रायल आणि हमास यांनी गाझामध्ये लढाई थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी म्हणाले की हा करार इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या मजबूत नेतृत्वाचे प्रतिबिंब देखील आहे.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर लिहिले की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर झालेल्या कराराचे आम्ही स्वागत करतो. हे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या मजबूत नेतृत्वाचे देखील प्रतिबिंब आहे.” ते म्हणाले, “आम्हाला आशा आहे की ओलिसांची सुटका आणि गाझाच्या लोकांना मानवतावादी मदत पोहोचवल्याने त्यांना दिलासा मिळेल आणि कायमस्वरूपी शांततेचा मार्ग मोकळा होईल.”
दोन वर्षांचे युद्ध संपणार
इजिप्तमधील दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर या करारावर स्वाक्षरी झाल्याचे निश्चित करण्यात आले. दोन वर्षांचे युद्ध संपवण्याच्या दिशेने उचललेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल आहे. या करारांतर्गत, गाझामध्ये युद्धबंदी लागू केली जाईल. इस्रायल गाझामधून अंशतः माघार घेईल आणि इस्रायलने ताब्यात घेतलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात हमासने ताब्यात घेतलेल्या ओलिसांना सोडेल.
गाझा आरोग्य मंत्रालयाने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे की ७ ऑक्टोबर २०२३ पासून गाझावरील इस्रायली हल्ल्यात ६७,१३९ पॅलेस्टिनी मारले गेले आहेत आणि १६९,५८३ जण जखमी झाले आहेत. बळी पडलेल्यांपैकी बहुतेक नागरिक होते, ज्यात अनेक महिला आणि मुले यांचा समावेश आहे.
ट्रम्पचा जेनेरिक औषधांवर दिलासा
भारत-अमेरिका व्यापार करारावर अद्याप कोणताही अंतिम करार झालेला नाही. दोन्ही देशांचे प्रतिनिधींदरम्यान सध्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, अमेरिकेने जेनेरिक औषधांच्या आयातीवर (ट्रम्प टॅरिफ ऑन जेनेरिक ड्रग) कर लादण्याची योजना तात्पुरती पुढे ढकलली आहे. ट्रम्पच्या या निर्णयामुळे भारतीय औषध कंपन्यांना मोठा दिलासा मिळेल. भारतीय औषध कंपन्या अमेरिकेत सुमारे ५० टक्के जेनेरिक औषधांचे उत्पादन करतात.