'आम्ही सर्वांचा हिशेब करू...' इराणने इस्रायलच्या रुग्णालयावर हल्ला केल्यानंतर नेतान्याहू कडाडले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Iranian missile hospital hit : इराणकडून इस्रायलच्या नागरी आणि वैद्यकीय क्षेत्रांवर झालेल्या मिसाईल हल्ल्यानंतर संपूर्ण मध्यपूर्व पेटली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री योअव काट्झ यांनी इराणविरोधात थेट कारवाईचे आदेश देत युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली आहे. इस्रायली संरक्षण दलांनी (IDF) इराणच्या अरक अणुभट्टीवर थेट हवाई हल्ला केला असून, यामध्ये 40 हून अधिक लढाऊ विमाने सहभागी झाली होती.
गुरुवारी( दि. 19 जून 2025 ) सकाळी इराणने बेअरशेबा येथील सोरोका रुग्णालय आणि तेल अवीवच्या नागरी भागांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. या घटनांमुळे इस्रायलमध्ये संतापाची लाट उसळली. पंतप्रधान नेतान्याहू यांनी जाहीर केले की, “तेहरानच्या हुकूमशहांबरोबर आता सूड घेणारच!” त्यांनी स्पष्ट केले की, इराणचे हे कृत्य फक्त लष्करी नव्हे, तर मानवीतेविरुद्धचा गुन्हा आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायली लष्कराला इराणच्या धोरणात्मक आणि सरकारी स्थळांवर तीव्र हल्ले करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
इस्रायलने प्रतिक्रिया म्हणून इराणच्या खोंदाब भागातील अरक अणुभट्टीवर हवाई हल्ला केला. ही अणुभट्टी उच्च दर्जाचा प्लुटोनियम तयार करण्यासाठी डिझाइन करण्यात आली होती. जो अणुशस्त्र उत्पादनासाठी महत्त्वाचा घटक आहे. IDF ने आपल्या निवेदनात म्हटले की, या कारवाईचा उद्देश अणुभट्टीचे अण्वस्त्र क्षमतेचे भाग नष्ट करणे हा होता, जेणेकरून इराण भविष्यात अणुबॉम्ब निर्मिती करू शकणार नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इराणवर राज्य करू शकतात राजघराण्यातील ‘या’ 3 कन्या; रझा पहलवी यांच्या सुंदर मुली राजकीय केंद्रस्थानी
या ऑपरेशनमध्ये इस्रायलच्या हवाई दलाच्या ४० लढाऊ विमानांनी सहभाग घेतला. त्यांनी इराणमधील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असेंब्ली प्लांट्स, कच्चा माल उत्पादक केंद्रे, हवाई संरक्षण तळ, आणि क्षेपणास्त्र निर्मिती केंद्रांवर बॉम्बहल्ले केले. या हल्ल्यामुळे इराणच्या लष्करी आणि अणुशास्त्रीय क्षमता मोठ्या प्रमाणात कमकुवत होण्याची शक्यता आहे.
विश्लेषकांच्या मते, इराणने केलेला हल्ला आतापर्यंतचा सर्वात आक्रमक आणि प्राणघातक हल्ला होता. यात फक्त लष्करी लक्ष्यच नव्हे तर नागरी ठिकाणे आणि आर्थिक केंद्रे, विशेषतः तेल अवीवमधील स्टॉक एक्सचेंजलाही लक्ष्य करण्यात आले. या कृतीमुळे इराणवर आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्ध गुन्हे केल्याचा आरोप होण्याची शक्यता आहे.
इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्झ यांनी खामेनी यांच्यावर थेट आरोप करत सांगितले, “भ्याड हुकूमशहा बंकरमध्ये बसून रुग्णालयांवर हल्ले करत आहे. हे युद्धाचे सर्वात गंभीर गुन्हे आहेत. याचे दायित्व खामेनींवरच आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-Canada Relations: CSIS अहवालातून धक्कादायक उघड! कॅनडामधून रचले जात आहेत भारतविरोधी हिंसाचाराचे कट
इराण व इस्रायलमधील संघर्ष आता प्रत्यक्ष अणुक्षमता आणि लष्करी कारवायांपर्यंत पोहोचला आहे. दोन्ही देश परस्परांना थेट इशारे देत असून, यामुळे मध्यपूर्वेतील स्थैर्य धोक्यात आले आहे. पश्चिम आशियामधील ही धगधगती परिस्थिती आंतरराष्ट्रीय समुदायासाठीही गंभीर चिंता निर्माण करणारी आहे.