अमेरिका-रशिया युद्धाच्या उंबरठ्यावर...; पुतिन-ट्रम्प यांच्यात शाब्दिक चकमक
Russia-America International Relations: “रशियावर अमेरिकेच्या टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी हल्ला झाला तर रशियाकडूनही अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. पण संघर्ष किंवा कोणत्याही वादापेक्षा संवाद नेहमीच चांगला असतो. आम्ही नेहमीच संवाद सुरू ठेवण्यासाठी समर्थन केले आहे.” अशी प्रतिक्रीया रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली आहे. अमेरिकेने रशियाच्या दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यानंतर पुतिन यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.
२२ ऑक्टोबर रोजी ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील प्रस्तावित बैठक रद्द झाल्यानंतर अमेरिकेने रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर, रोझनेफ्ट आणि लुकोइलवर निर्बंध लादले. हे निर्बंध रशिया-युक्रेन युद्ध थांबण्यासाठी लादण्यात आल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. पण पुतिन यांनी ट्रम्पच्या या निर्णयावर टीका करत त्यांच्या या निर्बंधांमुळे अमेरिका-रशिया संबंध बिघडू शकतात, याकडे लक्ष वेधले. ट्रम्प सुरुवातीला रशियाशी चांगले संबंध निर्माण करू इच्छित होते. परंतु युक्रेनसोबत सुरू असलेले युद्ध थांबवण्यास वारंवार नकार दिल्याबद्दल ते पुतिन यांच्यावर नाराज होते.
पुतिन म्हणाले की, “रशियन तेलावरील निर्बंधांमुळे तेलाचा पुरवठा कमी होईल. त्यामुळे जगभरातील तेलाच्या किमती वाढतील. तेलाच्या किमती केवळ रशियामध्येच नव्हे तर अमेरिकेत आणि जगभरात वाढू शकतात.
अमेरिकेने रशियाच्या दोन प्रमुख तेल कंपन्यांवर, रोझनेफ्ट आणि ल्युकोइल यांच्यावर नव्या निर्बंधांची घोषणा केली आहे. या कंपन्या अनुक्रमे सरकारी आणि खाजगी मालकीच्या असून, तेल शोध, शुद्धीकरण आणि विक्रीमध्ये कार्यरत आहेत. या दोन्ही कंपन्यांच्या ३६ उपकंपन्यांवरही निर्बंध लागू होणार आहेत. या उपकंपन्यांमध्ये रोझनेफ्ट किंवा ल्युकोइलचा ५० टक्क्यांहून अधिक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिस्सा आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, या दोन्ही कंपन्या रशियाच्या कच्च्या तेल निर्यातीपैकी जवळपास निम्मा हिस्सा सांभाळतात. त्यामुळे या निर्बंधांमुळे जागतिक तेलाच्या किमतीत सुमारे ५ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यासोबतच, युरोपियन युनियनने रशियन एलएनजी गॅस आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने ऊर्जा बाजारावर आणखी दबाव येण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने २१ नोव्हेंबरपासून हे निर्बंध लागू होणार असल्याचे जाहीर केले आहे. उर्वरित कंपन्यांना २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत रोझनेफ्ट आणि ल्युकोइलसोबतचे सर्व व्यवहार संपवण्याची मुदत दिली आहे. या आदेशाचे पालन न केल्यास दंड, काळ्या यादीत समावेश किंवा व्यापार निर्बंध अशा कारवायांचा सामना करावा लागू शकतो.
दरम्यान, भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि रोझनेफ्ट यांच्यात दीर्घकालीन व्यावसायिक संबंध आहेत. रिलायन्स ही रशियाकडून भारताकडे होणाऱ्या कच्च्या तेल आयातीतील सर्वात मोठी खरेदीदार कंपनी आहे. रिलायन्सने डिसेंबर २०२४ मध्ये रोझनेफ्टसोबत २५ वर्षांचा करार केला असून, त्यानुसार ती दररोज ५००,००० बॅरल (वार्षिक २५ दशलक्ष टन) कच्चे तेल आयात करणार आहे. या कराराची किंमत अंदाजे वार्षिक १२ ते १३ अब्ज डॉलर्स एवढी आहे.






