North Sumatra earthquake : गेल्या काही दिवसांपासून आशिया खंडातील अनेक देशांना भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरवून सोडले आहे. इंडोनेशिया, म्यानमार, अफगाणिस्तान आणि चीन या देशांमध्ये एका पाठोपाठ एक भूकंपाचे धक्के जाणवत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या घटनांमध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
इंडोनेशियात मध्यरात्री भूकंपाचे धक्के
१८ मेच्या पहाटे, भारतीय प्रमाणवेळेनुसार २:५० वाजता इंडोनेशियातील उत्तर सुमात्रा भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (NSC) च्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.६ इतकी नोंदवली गेली आहे. भूकंपाचे केंद्र जमिनीपासून ५८ किलोमीटर खोल होते. या घटनेनंतर अनेक घाबरलेले नागरिक रस्त्यावर आले. रात्र असली तरी लोकांनी झोपेची तमा न बाळगता सुरक्षित स्थळी जाण्यास प्राधान्य दिले.
म्यानमारमध्ये ५.४ तीव्रतेचा भूकंप
१७ मे २०२५ रोजी म्यानमारमधील क्युक्से शहराजवळ दुपारी ३:५४ वाजता भूकंपाचा धक्का बसला. युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटर (EMSC) च्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ५.४ रिश्टर स्केलवर होती. भूकंपाचे केंद्र क्युक्सेपासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले आहे. सुदैवाने, कोणतीही मोठी हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र नागरिकांच्या मनात भीतीचे सावट कायम आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘अवकाशातून माहिती, जमिनीवर प्रहार…’ Operation Sindoor मध्ये शत्रू सैन्यावर भारी पडले ISROचे ‘हे’ 10 बाहुबली
अफगाणिस्तानलाही हादरवले
१७ मे रोजीच, पहाटे ४:२६ वाजता, अफगाणिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप केंद्रानुसार, भूकंपाचे भौगोलिक स्थान ३६.३७ अंश उत्तर अक्षांश आणि ६९.८३ अंश पूर्व रेखांशावर होते, तर खोली १२० किलोमीटर नोंदली गेली. ही खोल भूकंप केंद्रस्थाने सहसा मोठ्या प्रमाणात धोकादायक नसतात, मात्र अफगाणिस्तानसारख्या पर्वतीय आणि धोकादायक प्रदेशात हे धक्के तात्कालिक परिणाम घडवू शकतात.
चीनमध्येही भूकंपाचे हादरे
या मालिकेतील आणखी एक धक्का १६ मे रोजी सकाळी ६:२९ वाजता चीनमध्ये जाणवला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केलवर मोजली गेली. भूकंपाची खोली केवळ १० किलोमीटर असल्यामुळे त्याचे परिणाम अधिक तीव्रतेने जाणवले. स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नागरिकांमध्ये वाढती भीती, प्रशासन सज्ज
गेल्या आठवडाभरात एकापाठोपाठ एक भूकंपाची नोंद झाल्याने संपूर्ण आशिया खंडात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाची तीव्रता फारशी विध्वंसक नसली तरी सातत्याने होणाऱ्या धक्क्यांमुळे नागरिक भीतीत आहेत. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क असून, भूकंपाच्या धक्क्यांनंतर बचाव कार्य, मालमत्तेची तपासणी आणि नागरिकांचे पुनर्वसन यासाठी तयारी करण्यात येत आहे. भूकंपाचे केंद्र खोल असले तरी हलक्याशा धक्क्यांनी देखील जीवे घातक परिणाम होऊ शकतात, याची जाणीव प्रशासनाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘N’ शब्दाने नवा वाद! भारत-पाकिस्तान ‘युद्धबंदीत’ ट्रम्प यांच्या हस्तक्षेपाचा दावा पुन्हा एकदा चर्चेत
सातत्याने होणाऱ्या भूकंपांची गंभीर दखल आवश्यक
आशिया खंडात अनेक देश भूकंपप्रवण क्षेत्रात येतात. त्यामुळे या सातत्याने होणाऱ्या भूकंपांच्या मालिकेची गंभीर शास्त्रीय तपासणी आणि पूर्वतयारी गरजेची आहे. नागरिकांनी देखील भूकंपाच्या काळात सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना शिकून ठेवाव्यात. सध्या कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात धोका टाळण्यासाठी सावधगिरी अनिवार्य आहे.