सुदानमध्ये ओडिशाच्या आदर्शचे अपहरण; शाहरुख खानशी आहे कनेक्शन
Sudan Kidnapping: सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धादरम्यान, ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यातील आदर्श बेहरा (३६) या भारतीय नागरिकाला रॅपिड सपोर्ट फोर्स (आरएसएफ) नावाच्या मिलिशिया गटाने ओलिस ठेवल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्यात २६ ऑक्टोबरला RSFने सुदानमधील अल-फशर शहरावर कब्जा केला. त्यावेळी आदर्श बेहरा याला ने ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. आदर्श बेहरा याला ताब्यात घेतल्यानंतर आता त्याच्या कुटुंबियांनी केंद्र सरकारकडे त्याच्या सुटकेची मागणी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्या कुटुंबियांनी केंद्र सरकार आणि बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानकडे आदर्शच्या सुटकेची विनंती केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदर्शच्या अपहरणानंतर एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात अपहरणकर्ते आदर्शला अभिनेता शाहरुख खानबद्दल विचारताना दिसत आहेत. आदर्शचा मेहुणा दीपक बेहरा यांच्या मते, अपहरणकर्त्यांनी व्हिडिओमध्ये शाहरुख खानचा उल्लेख केला आहे. आदर्शची पत्नी सुष्मिताने, अपहरणकर्ते शाहरुख खानचे चाहते असू शकतात आणि शाहरुखने अपील केल्याने आदर्शची सुटका होण्यास मदत होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे. व्हिडिओमध्ये, आरएसएफ सैनिक आदर्शला, तो शाहरुख खानला ओळखतो का, असा सवाल विचारताना दिसत आहेत. त्याला आरएसएफ कमांडर मोहम्मद हमदान दगालो (हेमेटी) चा उल्लेख करण्यास भाग पाडले जाते. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, त्याला “नमस्ते” म्हणण्यास भाग पाडले जाते.
आदर्श बेहेरा हा ओडिशाच्या जगतसिंहपूर जिल्ह्यातील कोटाकाना गावचा रहिवासी आहे. त्याचे कुटुंब, ज्यामध्ये त्याचे पालक, पत्नी सुष्मिता आणि दोन मुले (८ आणि ३ वर्षांची) यांचा समावेश आहे. आदर्शचे कुटुंब अत्यंत गरीब आहे. गरिबीमुळे आदर्श फक्त १० वी पर्यंतच शिक्षण घेतल्याचे आदर्शच्या आईचे म्हणणे आहे. मुंबई आणि गुजरातमधील प्लास्टिक कारखान्यांमध्ये काम करताना त्याला फक्त १५ ते १६ हजार रुपये मिळत होते, ज्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले. चांगल्या भविष्याच्या शोधात, आदर्श २०२२ मध्ये सुद्राती प्लास्टिक कारखान्यात मशीन ऑपरेटर म्हणून काम करण्यासाठी सुदानला गेला, जिथे त्याला ५०,०००-६०,००० रुपये पगार देण्यात आला.
आदर्शने आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्याचे आणि त्यांच्या मोडकळीस आलेल्या घराची दुरुस्ती करण्याचे स्वप्न पाहिले. आदर्शचे वडील खेत्रबासी (६५) हे बांगड्या विकून आणि मजूर म्हणून काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करत होते, परंतु आता ते उदरनिर्वाह करू शकत नाहीत. पत्नी सुष्मिता त्यांच्या तीन वर्षांच्या मुलामुळे काम करू शकत नाही, ज्यामुळे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे. आदर्शला अल-फशेरमध्ये ओलीस ठेवण्यात आले होते आणि दक्षिण दारफुरमधील आरएसएफचा बालेकिल्ला असलेल्या न्याला सिटीमध्ये नेण्यात आल्याचे मानले जाते.
अपहरण झाल्यापासून १० ते १२ दिवसांपासून कुटुंब आदर्शशी कोणताही संपर्क साधू शकले नाही. अपहरणानंतर सुष्मिताची प्रकृती बिघडली असून तिच्यावर बालासोरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आदर्शने कंपनी सोडली होती. त्याला भारतात परत पाठवण्यासाठी शहर सोडत असताना त्याला RSF च्या सैनिकांनी थांबवले आणि त्याचे अपहरण केल्याची माहिती आदर्शच्या कंपनी मालकाने दिली आहे. अपहरणकर्त्यांनी त्याचा मोबाईल फोन, पासपोर्ट आणि इतर कागदपत्रेही घेतली. तर, RSFच्या अपहरणकर्त्यांनी पैशांची मागणी केल्याचे कंपनी मालकाच्या वडिलांनी आणि बहिणीने म्हटले आहे.
ओडिशाचा रहिवासी आदर्श सुदानमध्ये ओलिस ठेवण्यात आला असून त्याची सुटका होण्यासाठी रेड क्रॉसच एकमेव आशा असल्याचे त्याने आपल्या पत्नीला फोनवर सांगितले आहे. गुप्तपणे झालेल्या या संभाषणात आदर्शने स्पष्ट केले की, रेड क्रॉसने हस्तक्षेप केला तरच त्याला सोडविणे शक्य आहे. ओलिस ठेवल्यानंतरपासून तो वारंवार रेड क्रॉसचा उल्लेख करत आहे.दरम्यान, ओडिशाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने आदर्शच्या अपहरणाची पुष्टी केली असून त्याच्या सुरक्षित परतीसाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे.
आदर्शचे वडील खेत्रबासी यांनी सांगितले की, “सुरुवातीला आम्हाला प्रशासनाकडून फारशी मदत मिळाली नाही. मात्र मुख्यमंत्री मोहन मांझी यांनी लवकरच मुलगा सुरक्षित परत आणण्याचे आश्वासन दिले आहे.”या प्रकरणात आमदार रमाकांत भोई यांनी केंद्र सरकारच्या थेट हस्तक्षेपाची मागणी केली आहे. एप्रिल २०२३ पासून सुदानमध्ये एसएएफ आणि आरएसएफ या गटांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देश उद्ध्वस्त झाला आहे. या संघर्षात १.३ कोटींहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.या अस्थिर आणि धोकादायक वातावरणात आदर्शच्या कुटुंबाची आशा आता सरकार, प्रशासन आणि रेड क्रॉससह एखाद्या “सुपरस्टार”च्या हस्तक्षेपावर टिकून आहे.






