डोनाल्ड ट्रम्पच्या शपथविधीची जगभर चर्चा; आईने दिलेली ‘ही’ खास भेट ठेवणार सोबत ( फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून 20 जानेवारी रोजी दुसऱ्यांदा जबाबदारी स्वीकारतील. या ऐतिहासिक क्षणादरम्यान ट्रम्प त्यांच्या आईने दिलेली एक खास भेट जवळ ठेवणार असल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प आईने दिलेली बायबल आणि लिंकन बायबलचा देखील वापरणार आहेत. शपथविधी समारंभासंबंधीच्या समितीने 17 जानेवारी रोजी यासंबंधित माहिती दिली. शपथविधी वॉशिंग्टन डी.सी.तील कॅपिटॉल रोटुंडा येथे आयोजित केला जाणार आहे.
1955 मध्ये आईने दिलेली भेट बायबल
मीडिया रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांची आई मेरी ट्रम्प यांनी 1995मध्ये न्यूयॉर्कच्या जमैका येथील फर्स्ट प्रेस्बिटेरियन चर्चमध्ये प्राथमिक शाळेच्या शिक्षणादरम्यान ट्रम्प यांना बायबल भेट दिली होती. या बायबलच्या कव्हरच्या खालच्या भागावर डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव कोरलेले आहे. ही बायबल थॉमस नेल्सन अँड सन्स यांनी 1953 मध्ये प्रकाशित केलेल्या “संशोधित मानक आवृत्ती”ची आहे. या बायबलच्या आतील कव्हरवर चर्चच्या अधिकाऱ्यांचे हस्ताक्षर देखील आहेत.
लिंकन बायबलचा वापर
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला लिंकन बायबलचाही वापर केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लिंकन बायबल प्रथम 4 मार्च 1861 रोजी अमेरिकेच्या 16व्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या शपथविधी समारंभात वापरण्यात आली होती. त्यानंतर या बायबलचा तीन वेळा वापर करण्यात आला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या दोन्ही कार्यकाळातील शपथविधी समारंभासाठी लिंकन बायबलचा वापर केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनीही आपल्या पहिल्या कार्यकाळात 2017 मध्ये लिंकन बायबलचा उपयोग केला होता.
ऐतिहासिक शपथविधी
तर, उपराष्ट्राध्यक्षपदी निवड झालेल्या जे.डी. वेंस त्यांच्या शपथविधीसाठी त्यांच्या आजीकडून मिळालेली कौटुंबिक बायबल वापरणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी समारंभ अमेरिकेच्या राजकीय आणि धार्मिक परंपरांशी जोडलेला आहे. तसेच त्यांच्या आईच्या भेट दिलेल्या बायबलचा समावेश शपथविधीला भावनिक आणि ऐतिहासिक महत्त्व देतो. तसेच लिंकन बायबलचा उपयोग अमेरिकेच्या इतिहासातील राष्ट्राध्यक्षपदाच्या परंपरेचे प्रतीक मानला जातो.
दरम्यान पदाभार स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात ट्रम्प यांची त्यांच्या सल्लागारांशी चर्चा सुरू असून लवकरच भट देण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चीनलाही भेट देणार असल्याचे म्हटले जात आहे. ट्रम्प शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी 21 जानेवारीला क्वाड समितीच्या परराष्ट्र मंत्र्यासोबत बैठक घेणार आहेत. ही बैठक वॉशिंग्टन डीसीमध्ये होण्याची शक्यता आहे. या बैठकीत अनेक योजनांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील ही पहिलीच बैठक असेल.या बैठकीत ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका यांचा समावेश आहे.