Iran-US War : अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामावर होणार पुन्हा चर्चा; दोन्ही बाजूंकडून नव्या चर्चेची तयारी - Google Gemini AI/Social Media)
वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे. यामुळे जगाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. असे असताना आता दिलासादायक माहिती समोर आली आहे. अमेरिका-इराण युद्धादरम्यानच चर्चेची नवी फेरी गुरुवारी सुरू होण्याची शक्यता आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंमधील नव्या चर्चेची तयारी सुरू आहे. या बैठकीची तयारी पूर्ण झाल्याचे अमेरिकी अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे.
अलीकडील तणाव आणि प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याच्या पार्श्वभूमीवर आहे. बैठकीचे नेमके ठिकाण आणि कार्यसूची याबाबतचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नसला तरी, चर्चेसाठी गुरुवार निश्चित करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंचे वरिष्ठ प्रतिनिधी यात सहभागी होऊ शकतात. दोन्ही देशांमधील संघर्षाचे कारण ठरलेल्या मुद्द्यांवर संवादाद्वारे एकमत साधण्याची अमेरिकेची इच्छा आहे.
दरम्यान, चर्चेच्या दुसऱ्या फेरीबाबत बोलताना अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स म्हणाले की, अमेरिकेने आपले प्राधान्यक्रम स्पष्टपणे मांडले आहेत. इस्लामाबाद येथील बैठकीत पूर्ण करार झाला नसला तरी, काही सकारात्मक संकेत मिळाले आहेत. चर्चेच्या दुसऱ्या फेरीत पहिल्या फेरीतील चुकांची पुनरावृत्ती होणार नाही. संघर्षात न जाता महत्त्वाच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी पर्यायांवर भर दिला जाईल. मात्र, आता चेंडू इराणच्या कोर्टात आहे आणि अमेरिका तेहरानच्या पुढील हालचालीची वाट पाहत आहे.
मॅक्रॉन यांचा शांततेसाठी पुढाकार
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सक्रिय झाले आहेत. एक मध्यस्थ म्हणून त्यांनी मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. ठप्प झालेली शांतता प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेशकियन यांनी मंगळवारी चर्चेच्या टेबलावर परत येण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, कोणतीही चर्चा आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीतच झाली पाहिजे, अशी त्यांची अट आहे.
ट्रम्पचे आदेश नाही मानणार; 5 Blacklisted ships पसार
जागतिक राजकारणात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणच्या विरोधात पुकारलेली नाकेबंदी. पाकिस्तानमधील शांतता चर्चा फिस्कटल्यानंतर ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी इराणची रसद तोडण्यासाठी कडक नाकेबंदी (Blockade) जाहीर केली. मात्र, ताजी उपग्रह चित्रे आणि सागरी ट्रॅकिंग डेटा (Maritime Tracking Data) काही वेगळीच आणि खळबळजनक कथा सांगत आहेत. अमेरिकेने ज्या जहाजांना ‘ब्लॅकलिस्ट’ केले होते, त्यापैकी पाच जहाजांनी अमेरिकन नौदलाच्या नाकाखालून हा मार्ग ओलांडला आहे.






