US Russia: अमेरिकेचा मोठा निर्णय; रशियावर निर्बंध तरीही ट्रम्प यांचा हिऱ्यांच्या कराराला ग्रीन सिग्नल, जाणून घ्या कारण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
US exempts Russian diamonds : रशियावर निर्बंध, पुतिन यांच्यावरील नाराजी आणि भारतावर लादलेले कर या सगळ्या राजकीय आणि आर्थिक दबावांमध्ये अमेरिकेने नुकताच घेतलेला निर्णय जगाच्या लक्षात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून हिरे आयात करण्यास अंशतः परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे केवळ आंतरराष्ट्रीय व्यापारालाच नाही तर भारत, चीन आणि युरोपसारख्या बाजारपेठांनाही मोठा धक्का बसू शकतो.
अमेरिका-रशिया संबंध गेल्या काही वर्षांत बरेच ताणले गेले आहेत. युक्रेन युद्धानंतर अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादले. त्यात ऊर्जा, शस्त्रास्त्र, बँकिंग व्यवहार यांसह रत्न-हिऱ्यांच्या व्यवहारावरही निर्बंध होते. मात्र या सर्व अटींमध्येच ट्रम्प प्रशासनाने नुकतीच एक मोठी सूट दिली.
ऑफिस ऑफ फॉरेन अॅसेट्स कंट्रोल (OFAC) च्या निवेदनानुसार –
१ सप्टेंबर २०२६ पर्यंत रशियातून विशिष्ट हिरे आयात करता येतील.
जर हिऱ्याचे वजन १ कॅरेटपेक्षा जास्त असेल आणि तो १ मार्च २०२४ पूर्वी रशियाबाहेर गेलेला असेल, तर त्याची आयात वैध ठरेल.
तसेच, ०.५ कॅरेटपेक्षा जास्त वजनाचे हिरे जर १ सप्टेंबर २०२४ पूर्वी रशियाबाहेर गेले असतील तर त्यांनाही आयातीची परवानगी मिळेल.
याचा अर्थ असा की अमेरिकेने थेट रशियाकडून हिरे मागवण्याऐवजी आधीच जगभरातील विविध बाजारपेठांमध्ये गेलेल्या रशियन हिऱ्यांना मार्ग मोकळा करून दिला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : किल ट्रम्प – Nuke India…मिनियापोलिस हल्ल्याचे थरारक सत्य; हल्लेखोराच्या विकृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर VIRAL
या सवलतीच्या निर्णयासोबतच भारताचा उल्लेख करणे महत्त्वाचे आहे. कारण ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लावला आहे. त्यांना भारताकडून रशियन तेल खरेदी केल्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्यांच्या मते, भारत रशियाकडून तेल खरेदी करून अप्रत्यक्षपणे युक्रेन युद्धाला निधी पुरवतो आहे. हाच आरोप त्यांनी चीनवरही केला आहे. मात्र विरोधाभास असा की, ट्रम्प यांनी एका बाजूला भारत-चीनवर नाराजी व्यक्त केली आणि दुसऱ्या बाजूला रशियन हिऱ्यांवर सवलत दिली.
भारत हा जगातील हिर्यांचा सर्वात मोठा प्रक्रिया केंद्र मानला जातो. सूरतसारख्या शहरात ८० टक्क्यांहून अधिक हिरे घासून-पोलिश केले जातात. त्यामुळे रशियातून येणाऱ्या हिऱ्यांचा पुरवठा थांबला तर भारताच्या उद्योगावर मोठा परिणाम होऊ शकतो. मात्र अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारताला एक वेगळा दबाव सहन करावा लागेल. कारण अमेरिकेला भारताचा रशियाशी असलेला व्यापार खपवत नाही. त्यातच ट्रम्प प्रशासनाने तेल-व्यवहारावर स्पष्ट नाराजी दाखवली आहे.
आज जागतिक राजकारणात अमेरिका-रशिया-भारत या त्रिकोणाचे समीकरण अतिशय गुंतागुंतीचे झाले आहे.
अमेरिका रशियावर निर्बंध लादत आहे, पण हिरे आयातीला परवानगी देते.
भारत रशियाकडून तेल घेतो, पण त्यावरून अमेरिकेची नाराजी वाढते.
चीन देखील रशियन तेल घेत असून हिरे बाजारात आपली पकड मजबूत करतो आहे.
या तिघांच्या खेळीमुळे पुढील काही वर्षे जागतिक अर्थव्यवस्थेत हिऱ्यांचा बाजार अस्थिर राहण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Air Strike: पाकिस्तानने आता कोणाविरुद्ध सुरू केले युद्ध? हवाई हल्ल्यांमुळे युद्धजन्य स्थिती, भारतावरही आरोप
ट्रम्प यांच्या या निर्णयामागे राजकीय, आर्थिक आणि व्यापारी गणितांचा मेळ आहे. एका बाजूला ते रशियाला दाबून ठेवू इच्छितात, तर दुसऱ्या बाजूला हिरे उद्योगावर परिणाम होऊ नये म्हणून निर्बंधांतून सूट देतात. पण यामुळे भारतासारख्या देशांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. आगामी काळात अमेरिका आणि भारताचे संबंध कुठल्या वळणावर जातील, तसेच रशियाचा हिरे उद्योग किती टिकून राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.