नवी दिल्ली : अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आज आपल्या पहिल्या अधिकृत भारत दौऱ्यावर दिल्लीत दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी उषा व्हान्स आणि मुले इवान, विवेक आणि मिराबेल, तसेच पेंटागॉन व परराष्ट्र विभागातील पाच वरिष्ठ अधिकारी आहेत. दिल्लीच्या पालम विमानतळावर सकाळी १० वाजता त्यांचे आगमन झाले असून, राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. चार दिवसांच्या या भारत दौर्यात उपराष्ट्रपती व्हान्स २४ एप्रिलपर्यंत भारतात असतील. त्यांच्या दौऱ्याचे उद्दिष्ट भारत-अमेरिका संबंध बळकट करणे, द्विपक्षीय व्यापार करारांना अंतिम स्वरूप देणे आणि दोन्ही देशांमधील सामरिक सहकार्य वृद्धिंगत करणे हे आहे.
दिल्लीत भव्य स्वागत आणि सुरक्षा व्यवस्था कडक
व्हान्स यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर, पालम विमानतळ ते चाणक्यपुरीपर्यंत होर्डिंग्ज आणि स्वागत फलक लावण्यात आले आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांनी विशेष मॉक ड्रिल आणि हाय अलर्ट सुरू केला आहे. दिल्लीतील संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा पथक तैनात करण्यात आले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, उपराष्ट्रपतींच्या प्रत्येक दौऱ्यासाठी सुरक्षा व्यवस्थेची सखोल तयारी केली आहे. विशेषतः, वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहील याची खात्री करण्याची योजना आखली आहे, जेणेकरून व्हान्स यांचा प्रवास कोणत्याही अडचणीशिवाय पार पडेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेचे उपराष्ट्रपती चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर; दिल्लीतील अक्षरधाम मंदिराला देणार भेट
धार्मिक आणि सांस्कृतिक ठिकाणी भेट
दिल्लीला पोहोचल्यानंतर काही तासांतच व्हान्स कुटुंबियांनी स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरात दर्शन घेण्याचे नियोजन केले आहे. या ठिकाणीही कडेकोट सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे. मंदिर परिसरात पोलीस आणि सुरक्षा पथकांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या भेटीदरम्यान व्हान्स कुटुंब पारंपरिक भारतीय हस्तकलेच्या वस्तू विकणाऱ्या शॉपिंग कॉम्प्लेक्सलाही भेट देणार आहे. यामुळे त्यांच्या दौर्याला सांस्कृतिक आणि कौटुंबिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.
US Vice President JD Vance, Second Lady Usha Vance and their children emplane for India, from Rome. He will be on his first official visit to India from 21 to 24 April. He will meet PM Modi as well #JDVance
pic.twitter.com/aZgRHmSAIP — Ankita (@Cric_gal) April 20, 2025
credit : social media
पंतप्रधान मोदींसोबत उच्चस्तरीय बैठक आणि जेवण
दिल्लीत आज संध्याकाळी ६:३० वाजता उपराष्ट्रपती व्हान्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे. या चर्चेत भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करार, संरक्षण सहकार्य, तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारी यासंबंधी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या बैठकीस परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, एनएसए अजित डोभाल, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा हेही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी अमेरिकन प्रतिनिधीमंडळासाठी खास रात्रीचे जेवण आयोजित करणार आहेत.
आग्रा आणि जयपूर दौऱ्यासाठी पुढील वाटचाल
दिल्लीतील भेटी नंतर, उपराष्ट्रपती व्हान्स आणि त्यांचे कुटुंब जयपूर आणि आग्रा या ऐतिहासिक शहरांना भेट देतील. या दौऱ्यात ते ताजमहाल, आंबर किल्ला, सिटी पॅलेस, आणि राजस्थानी संस्कृतीची झलक दर्शवणाऱ्या ठिकाणांना भेट देतील. त्यांच्या या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका सांस्कृतिक संबंधांनाही चालना मिळणार आहे, तसेच व्हान्स यांचा दौरा भारत-अमेरिका संबंधांमध्ये एक नवा टप्पा ठरू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जगाच्या नकाशावर ‘बोगनविले’ नवीन देश? पण अमेरिका-चीन यांच्यात संघर्षाची नवी ‘युद्धभूमी’ तयार होण्याची शक्यता
हा दौरा केवळ राजनैतिक नाही
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांचा हा दौरा केवळ राजनैतिक नाही, तर सांस्कृतिक आणि कौटुंबिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे भारत-अमेरिका मैत्रीचे संबंध आणखी मजबूत होतील, आणि जागतिक पातळीवरील द्विपक्षीय सहकार्याला नवीन दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.














