Photo Credit : Social Media
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये 2017 मध्ये हिंदूंची लोकसंख्या 35 लाख होती.त्यात 2023 पर्यंत 38 लाखांवर पोहचली आहे. ही आकडेवारी पाहता हिंदू हा इस्लामिक राष्ट्रातील सर्वात मोठा अल्पसंख्याक गट आहे असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या जनगणनेच्या अधिकृत आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे.
‘डॉन’ वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स (पीबीएस) ने गुरुवारी ७वी लोकसंख्या आणि गृहनिर्माण जनगणना 2023 चे निकाल जाहीर केले. 2023 मध्ये पाकिस्तानची एकूण लोकसंख्या 2,40,458,089 होती. एकूण लोकसंख्येतील मुस्लिमांचा वाटा 2017 मधील 96.47 टक्क्यांवरून 2023 मध्ये 96.35 टक्क्यांवर घसरला आहे, तर गेल्या सहा वर्षांत सर्व प्रमुख धार्मिक अल्पसंख्याकांची लोकसंख्या वाढली आहे.
हिंदूंची लोकसंख्या 2017 मध्ये 35 लाखांवरून 2023 मध्ये 38 लाखांपर्यंत वाढली, परंतु एकूण लोकसंख्येमध्ये त्यांचा वाटा 1.73 वरून 1.61 टक्क्यांवर आला आहे. यावरून इतर अल्पसंख्याक समुदायांची लोकसंख्या झपाट्याने वाढल्याचे दिसून येते. ख्रिश्चनांची लोकसंख्याही 26 लाखांवरून 33 लाखांवर पोहोचली. एकूण लोकसंख्येमध्ये ख्रिश्चनांचा वाटा 1.27 वरून 1.37 टक्के झाला आहे. अहमदी समाजाची वास्तविक लोकसंख्या तसेच एकूण लोकसंख्येतील त्यांचा वाटाही घटला आहे. त्यांच्या समुदायाची लोकसंख्या 2017 मध्ये 1,91,737 (एकूण लोकसंख्येच्या 0.09 टक्के) वरून 29,053 ने घटली असून 162,684 (एकूण लोकसंख्येच्या 0.07 टक्के) झाली. शीख समाजाची लोकसंख्या 15998 आणि पारशी समाजाची लोकसंख्या 2348 इतकी होती.
आकडेवारीनुसार, पाकिस्तानची लोकसंख्या 2017 मध्ये सुमारे 20.76 कोटी वरून 2023 मध्ये 2.55 टक्के वाढीने सुमारे 24.14 कोटीपर्यंत पोहचली आहे. या आकडेवारीनुसार 2050 पर्यंत पाकिस्तानची लोकसंख्या दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. लोकसंख्येनुसार एकूण पुरुषांची संख्या 12.432 कोटी होती, तर महिलांची संख्या 11.715 कोटी होती. लिंग गुणोत्तर 1.06 होते, तर ट्रान्सजेंडर लोकसंख्या 20,331 नोंदवली गेली. आकडेवारीनुसार 2023 मध्ये एकूण लोकसंख्येपैकी 67 टक्के लोकसंख्या 30 वर्षांपेक्षा कमी वयाची होती आणि 80 टक्के लोकसंख्या 40 वर्षांपेक्षा कमी होती. 67 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक एकूण लोकसंख्येच्या केवळ 3.55 टक्के होते. 2017 मध्ये एकूण लोकसंख्येच्या 66.12 टक्के विवाहित होते, तर 2023 मध्ये हा आकडा 64.79 इतका नोंदवला गेला.






