Trump-Putin Meeting: अलास्कामधील ट्रम्प-पुतिन भेटीचे गुपित उघड; करार नाही पण रशियाने 2.2 कोटी रोख दिल्याने चर्चेला उधाण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Putin cash payment Alaska : अमेरिका–रशिया संबंध गेल्या काही वर्षांपासून जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहेत. युक्रेन युद्धानंतर अमेरिकेने रशियावर कठोर निर्बंध लादले असून त्याचा प्रभाव केवळ अर्थव्यवस्थेवरच नाही तर राजनैतिक हालचालींवरही उमटताना दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर अलास्कामध्ये नुकतीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची ऐतिहासिक भेट झाली. परंतु या भेटीनंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी सांगितले की, पुतिन यांच्या शिष्टमंडळाला अमेरिकन बँकिंग प्रणालीचा वापर करता आला नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या तीन विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी तब्बल २.५ लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे २.२ कोटी रुपये रोख स्वरूपात द्यावे लागले.
एनबीसीला दिलेल्या मुलाखतीत रुबियो म्हणाले – “जेव्हा पुतिन यांचे पथक अलास्कामध्ये उतरले, तेव्हा त्यांच्या विमानांमध्ये इंधन भरणे आवश्यक होते. परंतु निर्बंधांमुळे ते आमच्या बँकिंग प्रणालीचा वापर करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना रोख रक्कम देऊन इंधन खरेदी करावे लागले. हा निर्बंधांचा थेट परिणाम आहे.” रुबियो पुढे म्हणाले की, “या निर्बंधांचा प्रभाव दररोज जाणवत आहे. मात्र इतके असूनही युद्धाची दिशा किंवा निकाल बदललेला नाही. त्यामुळे निर्बंध चुकीचे आहेत असे नाही, पण त्यांनी अपेक्षित बदल घडवून आणलेले नाहीत.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
१५ ऑगस्ट २०२५ रोजी पुतिन अलास्कामध्ये आले तेव्हा त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. लाल कार्पेट अंथरून अमेरिकन प्रशासनाने त्यांचे आदरातिथ्य केले. सुमारे पाच तास चाललेल्या या दौऱ्यात पुतिन आणि ट्रम्प यांच्यात दीर्घ चर्चा झाली. संयुक्त पत्रकार परिषदेनंतर पुतिन यांचे पथक तातडीने अलास्का सोडून गेले. ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, “या भेटीत कोणताही ठोस करार झालेला नाही.” मात्र काही वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, रशियाने एका मोठ्या ऑफरची चर्चा टेबलावर ठेवली असून ट्रम्प यांनी युक्रेनला त्या पर्यायावर विचार करण्यास प्रवृत्त केले असल्याचे संकेत मिळाले आहेत.
या संपूर्ण घडामोडीमुळे एक गोष्ट स्पष्ट होते आंतरराष्ट्रीय निर्बंध केवळ कागदोपत्री नसतात, तर ते थेट जागतिक राजकारणावर परिणाम घडवतात. इंधनासारख्या मूलभूत गोष्टींसाठीसुद्धा रोख रक्कमेवर अवलंबून राहावे लागणे, ही आधुनिक काळातील मोठी विडंबना आहे. अलास्कामधील या भेटीने पुन्हा एकदा अमेरिका–रशिया संबंधांचा गुंता जगासमोर आणला आहे. ट्रम्प यांनी भविष्यातील अमेरिकन धोरणाबाबत संकेत दिले नसले तरी या भेटीचा राजकीय संदेश नक्कीच मोठा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची अलास्कामधील भेट ही केवळ दोन नेत्यांची बैठक नव्हती; ती जागतिक राजकारणाचा आरसा होती. निर्बंधांच्या सावलीत रशियाला आपल्या विमानांना इंधन भरण्यासाठी रोख रक्कम द्यावी लागली, हा प्रसंग इतिहासात नोंदला जाणारा ठरेल. जगभरातील तज्ज्ञ आता या भेटीमागील खरी भूमिका आणि भविष्यातील घडामोडी काय असतील याचा वेध घेत आहेत.