शेअर ट्रेडिंगसाठी बँक खाते आवश्यक
आरोपींना सुनावली उद्यापर्यंत पोलिस कोठडी
सायबर गुन्ह्यांची रक्कम खात्यांवर जमा
ATM Card Fraud : छत्रपती संभाजीनगर सायबर गुन्ह्यांतून मिळालेली रक्कम सुरक्षितपणे वळती करण्यासाठी सर्वसामान्यांची बँक खाती कमिशनवर घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो, जीएसटीचा व्यवहार वाढल्याने इतरांची खाती हवी आहेत, असा बहाणा करून तरुणांकडून खाती, एटीएम कार्ड आणि सिमकार्ड मिळवले जात होते. या प्रकरणात उस्मानपुरा आणि सायबर पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून, टोळीच्या मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे.
संदीप नानासाहेब भालेराव (२६, रा. गोकुळवाडी, शेंद्रा एमआयडीसी) यांच्या तक्रारीवरून हा प्रकार उघडकीस आला. संदीप यांनी चिकलठाणा येथील एटीएममध्ये आदित्य तांबे आणि अभिषेक गलधर यांची ओळख झाली. त्यानंतर टेलिग्रामवरून संपर्क साधून त्यांना शहानूरमिया दर्गा परिसरातील डी-मार्ट येथे बोलावण्यात आले. तेथे अभिषेक आणि ऋषिकेश नावाच्या व्यक्तीने शेअर ट्रेडिंगसाठी बँक खाते आवश्यक असल्याचे सांगितले. खाते दिल्यास पाच ते दहा हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले.
सुरुवातीला संदीप यांनी नकार दिला; मात्र वारंवार आग्रह केल्यानंतर त्यांनी स्वतःचे खाते दिले. त्यानंतर बहिणीचे आणि मावस भावाचे खातेही संबंधितांकडे दिले. प्रत्येक खात्याच्या बदल्यात दहा हजार रुपये मिळाल्याचे तक्रारीत नमूद आहे. याशिवाय एटीएम कार्ड आणि सिमकार्डही देण्यात आले. २३ नोव्हेंबर रोजी बहिणीचे बैंक खाते गोठविल्याचे समजल्यानंतर संदीप यांनी ग्रामीण सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज यांच्या पथकाने अभिषेक भाऊसाहेब गलधर, रोहित विजय खंडाळगळे, आदित्य सुनील तांबे आणि यश अनिल जीवनलाल यांना ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
डिजिटल अरेस्टसह विविध सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम अशा खात्यांमध्ये जमा केली जात असल्याचा संशय आहे. त्यानंतर एजेंट एटीएम कार्डच्या माध्यमातून ही रक्कम काढून घेतात, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज यांनी दिली. संशयित भेटीसाठी विनक्रमांक दुचाकीचा वापर करीत होते, तसेच संपर्कासाठी टेलिग्राम कॉलिंगचा आधार घेत होते. या टोळीच्या मुख्य सूत्रधाराचा शोच सुरू आहे.