उपस्थितांनाही ते प्री-वेडिंग शूट असल्याचा भास झाला
Suman Music Marathi च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला
लीड हिरो म्हणून आणखी संधी मिळण्याची अपेक्षा
Meera Joshi Vishwanath Kulkarni Chemistry : मराठी मनोरंजनविश्वात मालिका, चित्रपट, वेब सीरिज आणि शॉर्ट फिल्म्स अशा विविध माध्यमांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा अभिनेता विश्वनाथ कुलकर्णी सध्या ‘रुणु झुणु’ या रोमँटिक गाण्यामुळे चर्चेत आहे. Suman Music Marathi या YouTube चॅनेलवर प्रदर्शित झालेल्या या गाण्यात विश्वनाथ पहिल्यांदाच लीड हिरो म्हणून रोमँटिक अंदाजात प्रेक्षकांसमोर आला आहे. विशेष म्हणजे, या गाण्याच्या निमित्ताने त्याने पहिल्यांदाच डान्सही केला आहे.
‘रुणु झुणु’मधील विश्वनाथ कुलकर्णी आणि अभिनेत्री मीरा जोशी यांची जोडी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. दोघांमधील रोमँटिक केमिस्ट्री गाण्याला एक वेगळीच रंगत देते. रोमँटिक दृश्यांचं शूटिंग करताना मीरा जोशी यांनी विश्वनाथला खूप सहज आणि आरामदायी वाटेल असं वातावरण दिलं. त्यामुळे दोघांनाही दृश्यांमध्ये नैसर्गिकपणे व्यक्त होता आलं आणि पडद्यावर त्यांची केमिस्ट्री अधिक खुलून आली.
या गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा एक मजेशीर आणि लक्षात राहणारा किस्सा विश्वनाथने सांगितला. गाण्यातील पहिलं दृश्य सिन्नर येथील ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिर परिसरात सकाळी शूट होत होतं. त्याचवेळी तिथे शाळेची सहल आली. शाळेतील मुलं या जोडीकडे कुतूहलाने पाहू लागली. तेव्हा त्यांच्या शिक्षिकेने मुलांना, “त्यांना त्रास देऊ नका, त्यांचं प्री-वेडिंग शूट सुरू आहे,” असं सांगितल.
प्रत्यक्षात ते गाण्याचं शूटिंग होतं; मात्र विश्वनाथ आणि मीरा यांची जोडी इतकी खरी आणि सहज वाटत होती की, उपस्थितांनाही ते प्री-वेडिंग शूट असल्याचा भास झाला. हा प्रसंग दोघांसाठीही खूप मजेशीर आणि अविस्मरणीय ठरला. विश्वनाथच्या मते, त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला मिळालेली ही एक प्रकारची पावतीच होती. तसेच, चेतन गरुड आणि वीणा गरुड यांनी या जोडीची केलेली निवड किती योग्य होती, हेही या प्रसंगातून अधोरेखित झालं.
अभिनयाचा अनुभव असला तरी ‘रुणु झुणु’च्या निमित्ताने विश्वनाथने पहिल्यांदाच डान्स केला. त्यामुळे हा अनुभव त्याच्यासाठी खास होता. अभिनयासोबत नृत्याची ही नवी बाजू सादर करण्याची संधी त्याला या गाण्यामुळे मिळाली. मीरा जोशी आणि नृत्यदिग्दर्शकांच्या सहकार्यामुळे हा अनुभव अधिक आनंददायी ठरला.
‘रुणु झुणु’ या गाण्याला YouTube वर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गाणं २.५ लाख व्ह्यूजचा टप्पा लवकरचं गाठणार असून, विश्वनाथ आणि मीरा यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे.
‘रुणु झुणु’ हे गाणं Suman Music Marathi या YouTube चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. चेतन गरुड आणि वीणा गरुड यांच्या निर्मिती व दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या गाण्याला हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी वावरे यांचे स्वर लाभले आहेत. ट्रिनिटी ब्रदर्स यांनी गाण्याचं संगीत आणि गीताची जबाबदारी सांभाळली आहे. मीरा जोशी आणि विश्वनाथ कुलकर्णी यांची जोडी हे या गाण्याचं प्रमुख आकर्षण ठरलं आहे.
कलाकार म्हणून प्रत्येक नवीन प्रोजेक्ट आपल्याला काहीतरी शिकवतो आणि स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याची संधी देतो, असं विश्वनाथ मानतो. ‘रुणु झुणु’ने त्याला रोमँटिक हिरो म्हणून स्वतःला सादर करण्याची संधी दिली. आता या अनुभवाच्या जोरावर यापुढेही चित्रपट, वेब सीरिज ,मालिका आणि इतर मनोरंजन माध्यमांमध्ये आणखी मोठ्या आणि प्रमुख भूमिका साकारण्याची त्याची तयारी आहे म्हणून विविध व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा विश्वनाथने व्यक्त केली आहे.