Narendra Modi : मोदींकडून नेपाळच्या पंतप्रधानांना खास भेटवस्तू; कलमकारी रामायण, बनारसी शाल आणि काशीचे गंगाजल Narendra Modi : मोदींकडून नेपाळच्या पंतप्रधानांना खास भेटवस्तू; कलमकारी रामायण, बनारसी शाल आणि काशीचे गंगाजल (फोटो सौजन्य : आयएएनएस)
India

Narendra Modi : मोदींकडून नेपाळच्या पंतप्रधानांना खास भेटवस्तू; कलमकारी रामायण, बनारसी शाल आणि काशीचे गंगाजल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांना कलमकारी शैलीतील संपूर्ण रामायण चित्रकृती, बनारसी ब्रोकेड सिल्क स्टोल आणि पितळी कलशातील काशीचे गंगाजल भेट दिले. या भेटवस्तू भारत-नेपाळच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंधांचे प्रतीक आहेत.

Rakesh Khedekar
  • अयोध्या ते जनकपूर आणि काशी ते काठमांडू

  • कलमकारी चित्रकृतीतून रामायणातील प्रसंग

  • पितळी कलशातून काशीचे गंगाजल

Narendra Modi : भारत दौऱ्यावर असलेले नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांचे दौऱ्याच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवशी राष्ट्रपती भवनात स्वागत करण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाह यांना भारताच्या सांस्कृतिक आणि कलात्मक परंपरेची ओळख करून देणाऱ्या तीन खास भेटवस्तू दिल्या. यामध्ये कलमकारी शैलीतील 'संपूर्ण रामायण' चित्रकृती, बनारसी ब्रोकेड सिल्क स्टोल आणि पितळी कलशातील काशीचे गंगाजल यांचा समावेश आहे.

कलमकारी चित्रकृतीतून रामायणातील प्रसंग

मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानांना दिलेली कलमकारी शैलीतील 'संपूर्ण रामायण' ही विशाल चित्रकृती आहे. यामध्ये प्रभू राम यांचा जन्म, वनवास, रावणावरील विजय आणि अयोध्येला परतणे अशा जीवनातील प्रमुख घटनांचे चित्रण करण्यात आले आहे.

आंध्र प्रदेशातील पारंपरिक 'श्रीकालहस्ती' शैलीत सुती कापडावर ही चित्रकृती हाताने साकारण्यात आली आहे. यासाठी बांबूच्या लेखणीचा आणि नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला आहे. भारतीय कथाकथनाची समृद्ध परंपरा, भक्तिभाव आणि पारंपरिक कलाकुसरीचे दर्शन या चित्रकृतीतून घडते.

ही भेट भारत आणि नेपाळमधील सांस्कृतिक व आध्यात्मिक संबंधांचे प्रतीक मानली जात आहे. प्रभू रामांची नगरी अयोध्या आणि माता सीतेचे जन्मस्थान जनकपूर यांच्यातील धार्मिक नातेही या चित्रकृतीतून अधोरेखित होते.

गुजरातच्या सादेली बॉक्समध्ये बनारसी सिल्क स्टोल

पंतप्रधान मोदी यांनी बालेन्द्र शाह यांना गुजरातच्या पारंपरिक 'सादेली' बॉक्समध्ये ठेवलेला बनारसी ब्रोकेड सिल्क स्टोलही भेट दिला. वाराणसीतील कुशल विणकरांनी हा स्टोल तयार केला असून, त्यावर अतिशय बारीक नक्षीकाम आणि चमकदार जरकाम करण्यात आले आहे.

या स्टोलसाठी वापरण्यात आलेल्या सादेली बॉक्सवर पारंपरिक लाकडी कोरीवकाम आणि भौमितिक आकारांची नक्षी आहे. या भेटीतून वाराणसी आणि गुजरातच्या समृद्ध कलात्मक वारशाचे दर्शन घडते. भारतातील पिढ्यान्‌पिढ्या जपल्या गेलेल्या हस्तकलेच्या परंपरेचेही हे प्रतीक आहे.

पितळी कलशातून काशीचे गंगाजल

या दोन भेटवस्तूंसोबतच मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानांना पितळी कलशात ठेवलेले काशीचे पवित्र गंगाजलही भेट दिले. काशी विश्वनाथ मंदिराजवळून वाहणाऱ्या गंगेतून आणलेले हे जल पवित्रता, भक्ती आणि दैवी आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते.

काशीचे बाबा विश्वनाथ आणि काठमांडूचे भगवान पशुपतिनाथ हे भगवान शिवाचे पूजनीय स्वरूप आहेत. त्यामुळे गंगाजलाची ही भेट भारत आणि नेपाळमधील धार्मिक व आध्यात्मिक संबंध अधोरेखित करणारी आहे. दोन्ही देशांमधील मैत्री अधिक दृढ व्हावी, तसेच शांती, समृद्धी आणि आध्यात्मिक एकतेचा संदेश पोहोचावा, हा या भेटीमागील भावार्थ आहे.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका