हिवाळ्यात केस कोरडे का पडतात?
केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी उपाय?
घरगुती हेअर ऑइल बनवण्याची सोपी कृती?
Homemade Hair Oil: थंडीच्या दिवसांमध्ये शरीरासोबतच त्वचा आणि केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवतात. केस कोरडे पडणे, केसांमध्ये कोंडा होणे तर काहीवेळा टाळूवर इन्फेक्शन सुद्धा वाढते. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर महागडे हेअर केअर प्रॉडक्ट्स वापरले जातात. तर काहीवेळा हेअर केअर ट्रीटमेंट करून केसांची काळजी घेतली जाते. पण वारंवार केमिकल प्रॉडक्टचा वापर केल्यास केसांची गुणवत्ता सुधारण्याऐवजी आणखीनच खराब होऊन जाते आणि केस कोरडे पडतात. केस कोरडे झाल्यानंतर कितीही चांगली हेअर स्टाईल केली तरीसुद्धा केस अजिबात चांगले दिसत नाही. (फोटो सौजन्य – istock)
महिलांच्या सौंदर्यात भर पाडण्याचे काम केस करतात, त्यामुळे प्रत्येक महिलेला आपले केस कायमच सुंदर आणि लांबलचक हवे असतात. केसांना कायमच वरून पोषण दिले जाते, पण त्यासोबतच केसांना आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. अशावेळी स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करून केसांच्या वाढीसाठी घरगुती तेल बनवू शकता. या तेलाच्या वापरामुळे केस चमकदार, लांबलचक आणि मुलायम होण्यास मदत होते. नैसर्गिक घटकांनी समृद्ध असलेले तेल केसांच्या मुळांना पोषण देते.
केसांसाठी खास तेल तयार करण्यासाठी लागणारे साहित्य:
मोहरीचे तेल
आल्याचे तुकडे
लसूण पाकळ्या
लवंग
घरगुती तेल बनवण्याची सोपी कृती:
तेल बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात मोहरीचे तेल घेऊन गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम करताना गॅस मंद आचेवर ठेवावा. खलबत्यामध्ये आल्याचे तुकडे, लसूण पाकळ्या आणि लवंग घालून कुटून घ्या. कुटून घेतलेले मिश्रण मोहरीच्या तेलात घालून व्यवस्थित शिजवा. १५ ते २० मिनिटं मिश्रण मोहरीच्या तेलात शिजवून घ्या. यामुळे तेलात सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स होतील आणि चव मस्त लागेल. तयार केलेले तेल थंड झाल्यानंतर गाळणीच्या मदतीने गाळून घ्या आणि बाटलीमध्ये भरून ठेवा.
घरगुती तेल केसांना लावण्याआधी हलकेसे गरम करून घ्यावे. केस धुवण्याच्या एक ते दोन तास आधी केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत तेल लावून हलक्या हाताने मसाज करा आणि केस बांधून ठेवा. १ तासानंतर सौम्य शाम्पू कंडिशनरने केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. मोहरीच्या तेलामध्ये फॅटी ॲसिड्स आणि विटामिन 'ई' असते, ज्यामुळे केसांना मॉईश्चर मिळते आणि हिवाळ्यात केसांमध्ये वाढलेला कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.