In IVF treatment, the focus is on transferring only one embryo at a time (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)  In IVF treatment, the focus is on transferring only one embryo at a time (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
लाइफ स्टाइल

Health news: आयव्हीएफ उपचारात एकावेळी एकच भ्रूण प्रत्यारोपित करण्यावर भर; आई आणि बाळाच्या सुरक्षिततेला प्राधान्य

Health news: आयव्हीएफ उपचारांमध्ये एका वेळी एकच भ्रूण प्रत्यारोपित करण्याच्या पद्धतीला प्राधान्य दिले जात आहे. सिंगल एम्ब्रियो ट्रान्सफरमुळे जुळ्या किंवा त्याहून अधिक बाळांच्या गर्भधारणेशी संबंधित धोके कमी करण्यास मदत होते. आईचे आरोग्य सुरक्षित राखून निरोगी बाळाचा जन्म व्हावा, यावर आधुनिक आयव्हीएफ उपचारांमध्ये भर दिला जात आहे.

siddhi

आयव्हीएफ उपचारांमध्ये गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी पूर्वी अनेकदा एकापेक्षा अधिक भ्रूण गर्भाशयात प्रत्यारोपित केले जात होते. मात्र, यामुळे जुळ्या किंवा त्याहून अधिक बाळांची गर्भधारणा होऊन आई आणि बाळाच्या आरोग्याशी संबंधित गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता एका वेळी एकच भ्रूण प्रत्यारोपित करण्याच्या पद्धतीला प्राधान्य दिले जात असून, गर्भधारणेबरोबरच सुरक्षित प्रसूती आणि निरोगी बाळाच्या जन्मावर भर दिला जात आहे असे डॉ. रश्मी निफाडकर यांनी सांगितले. डॉ.रश्मी निफाडकर, प्रजननक्षमता तज्ज्ञ, नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, बाणेर, पुणे

आयव्हीएफ उपचारांच्या सुरुवातीच्या काळात गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी उपाय

आयव्हीएफ उपचारांच्या सुरुवातीच्या काळात गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी एका वेळी दोन किंवा त्यापेक्षा अधिक भ्रूण गर्भाशयात प्रत्यारोपित केले जात असत. मात्र, एकापेक्षा अधिक भ्रूण प्रत्यारोपित केल्यामुळे जुळ्या किंवा त्याहून अधिक बाळांची गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. अशी गर्भधारणा दिसायला आनंददायी वाटत असली, तरी त्यामध्ये आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्याशी संबंधित अनेक धोके असू शकतात. जुळ्या किंवा एकापेक्षा अधिक बाळांची गर्भधारणा झाल्यास मुदतपूर्व प्रसूती, बाळाचे जन्मावेळचे कमी वजन, गर्भावस्थेत उच्च रक्तदाब, गर्भावस्थेतील मधुमेह तसेच नवजात बालकांना अतिदक्षता विभागात उपचारांची गरज भासण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आयव्हीएफ उपचारांमध्ये केवळ गर्भधारणा होण्यापेक्षा ती सुरक्षित आणि निरोगी असणे अधिक महत्त्वाचे ठरते.

‘सिंगल एम्ब्रियो ट्रान्सफर’ म्हणजे काय?

‘सिंगल एम्ब्रियो ट्रान्सफर’ पद्धतीमध्ये एका उपचार चक्रात एकच योग्य भ्रूण महिलेच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केला जातो. आधुनिक आयव्हीएफ तंत्रज्ञानामुळे भ्रूणाची वाढ आणि विकास अधिक प्रभावीपणे तपासणे शक्य झाले आहे. त्यामुळे गर्भधारणेची क्षमता चांगली असलेल्या भ्रूणाची निवड करून प्रत्यारोपणाचा निर्णय घेता येतो.यामध्ये ‘ब्लास्टोसिस्ट कल्चर’ या तंत्राचाही वापर केला जातो. या प्रक्रियेत प्रयोगशाळेत भ्रूणाला पाच ते सहा दिवसांपर्यंत विकसित होऊ दिले जाते. त्यानंतर त्याच्या वाढीचे आणि विकासाचे निरीक्षण करून योग्य भ्रूण निवडण्यास मदत होते.

त्या पद्धतीचा फायदा कोणता आहे?

या पद्धतीचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रत्यारोपणासाठी निवडलेल्या भ्रूणाव्यतिरिक्त चांगल्या गुणवत्तेचे इतर भ्रूण भविष्यातील वापरासाठी गोठवून ठेवता येतात. पहिल्या प्रयत्नात गर्भधारणा झाली नाही किंवा जोडप्याला भविष्यात आणखी एक मूल हवे असल्यास या भ्रूणांचा पुढील उपचारांमध्ये वापर करता येतो. त्यामुळे प्रत्येक वेळी नव्याने अंडाशयाला उत्तेजित करणारी औषधे देणे आणि स्त्रीबीज मिळवण्याची प्रक्रिया करणे टाळता येऊ शकते. अर्थात, हे प्रत्येक रुग्णाच्या परिस्थितीवर अवलंबून असते. मात्र, सिंगल एम्ब्रियो ट्रान्सफर ही पद्धत प्रत्येक महिलेसाठी योग्य असेलच असे नाही. महिलेचे वय, वंध्यत्वाचा वैद्यकीय इतिहास, भ्रूणाची गुणवत्ता, यापूर्वी केलेल्या आयव्हीएफ उपचारांचे परिणाम आणि इतर वैद्यकीय बाबी लक्षात घेऊन उपचारपद्धती ठरवावी लागते.

प्रजननक्षमतेवरील उपचार प्रत्येक रुग्णाच्या वैद्यकीय परिस्थितीनुसार ठरवणे आवश्यक आहे. सिंगल एम्ब्रियो ट्रान्सफर हा सुरक्षित उपचारांसाठी महत्त्वाचा पर्याय असला, तरी तो प्रत्येकासाठी योग्यच असेल असे नाही. एका भ्रूणाचे प्रत्यारोपण केल्याने गर्भधारणेची हमी मिळत नाही; मात्र जुळ्या किंवा त्याहून अधिक बाळांच्या गर्भधारणेशी संबंधित वैद्यकीय धोके कमी करण्यास मदत होते. त्यामुळे उपचारांचे यश केवळ गर्भधारणा झाली की नाही, यावर न ठरवता आई आणि बाळाचे आरोग्य कसे राहिले, यालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. आयव्हीएफ तंत्रज्ञानात सातत्याने सुधारणा होत असताना प्रजननक्षमतेवरील उपचार अधिक सुरक्षित आणि रुग्णकेंद्रित करण्याकडे वैद्यकीय क्षेत्राचा कल वाढत आहे. एका वेळी एकच भ्रूण प्रत्यारोपित करण्याची पद्धत याच दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. कारण आयव्हीएफ उपचारांचे खरे यश केवळ गर्भधारणा होण्यात नसून आईचे आरोग्य सुरक्षित राखून निरोगी बाळाला जन्म देण्यात आहे.

'हे निर्लज्जपणाचे लक्षण...', रोहित पवारांवर चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट: G ते ZX व्हेरिएंटमध्ये काय मिळणार? किंमत आणि फीचर्सची संपूर्ण माहिती

Indian Army Career: लष्करात कसे बनता येते लेफ्टिनेंट कर्नल? जाणून घ्या प्रमोशनचे संपूर्ण टप्पे!

वाळूमाफियांची दादागिरी! शासकीय कार्यालयात घुसून तलाठ्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला...

Defense News : डोकलामच्या पूर्वेला चीनचा नवा डाव! तोर्शा खोऱ्यात जमीन साफ केल्याचे उपग्रह फोटोंमधून उघड; भारताची चिंता वाढली