प्रत्येक गावात पाणी साठवण टाक्या उभारण्यावर भर
बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित
तातडीने उपाययोजना करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
Dharashiv Water Storage : जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठा वेगाने घटत असून तो 5.14 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पुढील आठ महिन्यांचे काटेकोर नियोजन करावे. हे नियोजन कागदावर न ठेवता प्रत्येक कुटुंबापर्यंत पाणी पोहोचविण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. पाणीटंचाईवरील उपाययोजनांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
धाराशिव जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी बुधवारी (दि. 25) मंत्रालयात बैठक झाली. मागील महिन्यात सुमारे आठ टक्के असलेला पाणीसाठा आता 5.14 टक्क्यांवर आल्याने आगामी काळातील संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता बैठकीत व्यक्त करण्यात आली.
पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर टँकर सुरू करण्याऐवजी आधीच उपाययोजना कराव्यात. प्रत्येक गावात आवश्यकतेनुसार पाणी साठवण टाक्या उभाराव्यात, पर्यायी जलस्रोतांचा शोध घ्यावा आणि अस्तित्वातील पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती तातडीने करावी, असे निर्देश सरनाईक यांनी दिले.
पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देतानाच शेतकऱ्यांच्या फळबागा वाचविण्यासाठी स्वतंत्र पाणी नियोजन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. नदी व तलावांतील गाळ काढण्याच्या कामांना गती देऊन हा गाळ जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने द्यावा. स्वखर्चाने गाळ काढू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी परवानगीची प्रक्रिया सुलभ करावी, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीला पाणीपुरवठा, जलसंपदा, ग्रामविकास आणि मृद व जलसंधारण विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सर्व विभागांनी समन्वयाने कालबद्ध नियोजनाची अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले. दरम्यान, घटता जलसाठा पाहता या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.