Devendra Fadnavis : इंदू मिल स्मारक प्रकरणी देवेंद्र फडणवीस आक्रमक! अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोलं फोटो सौजन्य : सोशल मीडिया
मुंबई

Devendra Fadnavis : इंदू मिल स्मारक प्रकरणी देवेंद्र फडणवीस आक्रमक! अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोलं

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाला होत असलेल्या विलंबावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. वाढील बिलाच्या प्रस्तावामुळे मागील सहा महिन्यांपासून काम बंद असल्याने आता स्मारक बनण्यासाठी तब्बल दोन वर्षांचा अवधी लागणार असल्याची शक्यता आहे.

Rakesh Khedekar
  • सहा महिन्यांपासून स्मारकाचे काम ठप्प

  • दोन वर्षांचा विलंब होण्याची शक्यता

  • वाढीव खर्चाच्या प्रस्तावाचा निर्णय रखडल्याने काम बंद?

Devendra Fadnavis : मागील अनेक वर्षांपासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा प्रश्न जैसे थे आहे. बाबासाहेबांचं भव्य स्मारक व्हावं म्हणून राज्य सरकारनं इंदू मिलची जागा दिली, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून येथील काम म्हणावं तसं पूर्णत्वास गेलेलं नाही, परिणामी दिलेल्या वेळेत स्मारकाचं काम झालेलं नाही. आता याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले असून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

त्याचं झालं असे की, बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, पण राज्य सरकारच्या दुर्लक्षतेमुळे मागील सहा महिन्यांपासून येथील काम बंद होते. धक्कादायक बाब म्हणजे, आता हे काम पूर्ण व्हायला तब्बल दोन वर्षांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. म्हणूनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित कंपनीच्या मालकांसमोरच अधिकाऱ्यांना बैठकीत खडे बोल सुनावलेत. आता, कोणतीच दिरंगाई सहन करणार नसल्याचे सांगत हे काम तातडीने करण्याचे आदेश त्यांनी या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ सोशल मीडियात समोर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात समोर आला आहे. त्यात ते इंदू मिल स्मारकाच्या बैठकीत संबंधित कंपनी असलेल्या शहापूरजी पालनजी यांच्या बैठकीत कामाच्या दिरंगाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावताना दिसत आहेत.

या व्हिडिओत ते असे बोलताना दिसतात की, स्मारकाच्या कामास उशीर झाल्याबाबत तुम्हाला काही फरक पडणार नाही, मात्र त्याचा आम्हाला फरक पडतो. आज तुम्ही आलात, पुढच्या बैठकीला दुसऱ्याला पाठवाल, पुन्हा तिसऱ्याला, असं होत नाही असे म्हणत फडणवीस चांगलेच संतापलेले दिसत आहेत.

ते पुढे म्हणतात की, आम्ही महाराष्ट्रात 10 प्रोजेक्ट केले आहेत, यापेक्षाही जास्त कॉम्प्लिकेटेड ते होते. पण, तुम्ही आम्हाला हे कॉम्प्लिकेटेड असल्याचं सांगता, यात काय कॉम्प्लिकेशन आहे. मला आता निर्णय पाहिजे, टाईमलाईन पाहिजे, असे म्हणत वेळेत हे काम पूर्ण झालं पाहिजे, अशी तंबीच मुख्यमंत्र्यांनी संबंधित कंपनीच्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना दिली.

आखाती देशाचा स्मारकाला फटका

आखाती देशातील युद्धाचा फटका इंदुमिल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला बसल्याचे सांगितले जात आहे. जागतिक स्तरावर तांबे आणि एलपीजी गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कांस्याची किंमत वाढल्याने प्रकल्पाची किंमत वाढली आहे. राज्य सरकारकडे 350 कोटी रुपयांच्या वाढीव प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या वाढीव किंमतीच्या प्रस्तावाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने सहा महिन्यांपासून पुतळ्याचे काम बंद आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे काम पूर्ण होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांच्या वतीने करण्यात येत आहे.

इंदू मिल स्मारकाचा आतापर्यंतचा प्रवास

2007 ते 2011 : मागणी आणि आंदोलनाची सुरुवात

चैत्यभूमीलगत असलेल्या बंद इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांनी लावून धरली. 2011 मध्ये या मागणीसाठी मोठी आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले.

डिसेंबर 2012 : केंद्र सरकारची सैद्धांतिक मान्यता

तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी संसदेत इंदू मिलची 12 एकर जागा स्मारकासाठी देण्यास सैद्धांतिक मान्यता दिल्याची घोषणा केली. मात्र, जागा राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) मालकीची असल्याने हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली.

एप्रिल 2015 : त्रिपक्षीय करार आणि जमीन हस्तांतरण

केंद्र सरकारचे वस्त्रोद्योग मंत्रालय, राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ (एनटीसी) आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात स्मारकासाठी जमीन हस्तांतरित करण्याबाबत त्रिपक्षीय करार झाला.

11 ऑक्टोबर 2015 : स्मारकाचे भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इंदू मिल स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले.

2017 ते 2018 : आराखड्यात बदल आणि बांधकामाला सुरुवात

सुरुवातीला 250 फूट उंच पुतळ्याचा प्रस्ताव होता. त्यानंतर सुधारित आराखड्यात पुतळ्याची उंची 350 फूट, तर पादपीठाची उंची 100 फूट निश्चित करण्यात आली. अशा प्रकारे स्मारकाची एकूण उंची 450 फूट प्रस्तावित करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाने सुधारित आराखड्याला आणि खर्चाला मंजुरी दिली. 2018 मध्ये बांधकामाचे कंत्राट शापूरजी पालनजी समूहाला देण्यात आले.

Pune News: "विरोधकांनाही पाठिंबा द्यावाच लागेल!", सचिन अहीर यांची रोखठोक भूमिका

Sharad Pawar यांनी साथ सोडली, ठाकरेंचं टेन्शन वाढलं! पण Eknath Shinde यांची झोप का उडाली?

FDA Raid Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ची धडक कारवाई! १२ हॉटेल, कॅन्टीन आणि स्टोअरचे परवाने निलंबित

Kartik Amavasya 2026: कधी आहे कार्तिक अमावस्या; जाणून घ्या तिथी, धार्मिक महत्त्व आणि पूजाविधी

Goa Maze App Launched: गोवा फिरणं होणार सुपर इझी! 'या' अॅप'मुळे बसपासून रिक्षापर्यंत सर्व सेवा एका क्लिकवर