सकाळी सात वाजल्यापासून स्वच्छता मोहीम
संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन
राज्यातील ११ किल्ल्यांवर एकाच वेळी अभियान
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक प्रतापगडावर २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त भव्य स्वच्छता व संवर्धन महाअभियान राबविण्यात येणार आहे. ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत गडाचे ऐतिहासिक वैभव जपणे, पर्यावरण संवर्धन आणि संविधानातील लोकशाही मूल्यांविषयी जनजागृती केली जाणार आहे. तहसीलदार सचिन म्हस्के यांच्या समन्वयातून या अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे.
२६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते ९ या वेळेत प्रतापगडाचा पायथा, वाहनतळ, पायऱ्यांचा मार्ग आणि परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. ‘माझा गड, माझी जबाबदारी’ आणि ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ या संकल्पनेतून हा उपक्रम होणार आहे. यामध्ये दुर्गप्रेमी संस्था, ट्रेकिंग क्लब, युवक मंडळे, विद्यार्थी, एनसीसी आणि एनएसएस स्वयंसेवकांसह स्थानिक ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.
संकलित कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने वर्गीकरण करून पुनर्वापर आणि योग्य विल्हेवाट लावण्यावर भर दिला जाणार आहे. ज्यूट व कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. प्रतापगडावर शून्य कचरा व्यवस्थापनाचा आदर्श निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सकाळी ११ ते दुपारी १२.१० या वेळेत मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन होणार आहे. राज्यातील अन्य दहा किल्ल्यांवर सुरू असलेल्या कार्यक्रमांशी ऑनलाइन थेट संपर्क साधला जाणार आहे.
तसेच संविधानातील अनुच्छेद ५१ (अ) (ग) नुसार पर्यावरण, वन्यजीव आणि ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणाची शपथ घेतली जाणार आहे. ‘स्वराज्याचा वारसा, संविधानाचा वसा’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात प्रबोधनात्मक पोवाडे, स्थानिक लोककला, पथनाट्ये आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. गडसंवर्धनासाठी योगदान देणाऱ्या स्थानिक गडमित्रांचा आणि संस्थांचाही गौरव केला जाणार आहे.
प्रतापगडासह रायगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, राजगड, पन्हाळा, साल्हेर, लोहगड, सुवर्णदुर्ग, शिवनेरी आणि खंदेरी या ११ ऐतिहासिक किल्ल्यांवर एकाच वेळी हे अभियान राबविण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून विविध शासकीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
प्रतापगडाच्या पायथ्याशी प्लास्टिकमुक्तीबाबत जनजागृती, पर्यटकांसाठी माहिती फलक, क्यूआर कोड आधारित ऑडिओ गाईड आणि स्वयंसेवकांसाठी डिजिटल प्रमाणपत्राची सुविधाही उपलब्ध असेल. या कार्यक्रमाला पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.