बारामतीतील वाढत्या गुन्हेगारीने चिंता वाढवली
खंडणीसाठी उद्योजकाच्या गाडीवर गोळीबार
युगेंद्र पवारांची डीवायएसपी चैतन्य कदम यांच्याशी चर्चा
बारामती / प्रतिनिधी : शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. खंडणीसाठी गोळीबार, मारहाण, धारदार शस्त्रांनी हल्ले आणि तरुणाईचा गुन्हेगारीकडे वाढता कल अशा घटनांमुळे बारामतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांची भेट घेऊन शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली.
बारामती शहराची शांत, सुरक्षित आणि विकसित शहर अशी ओळख आहे. मात्र, अलीकडच्या काळात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे या प्रतिमेला धक्का बसत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. विशेषतः उद्योजकांना धमकावून खंडणी मागणे आणि त्यासाठी थेट गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जाणे ही गंभीर बाब मानली जात आहे.
२१ नोव्हेंबर रोजी बारामतीतील बांधकाम व्यावसायिक राजन कोळेकर यांच्या वाहनावर खंडणीच्या मागणीतून गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत दोन पिस्तुले जप्त केली आहेत. या घटनेने शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक चर्चेत आला आहे.
याच पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांनी चैतन्य कदम यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क राहणे, गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करणे आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आवश्यक असल्याचे या चर्चेत अधोरेखित करण्यात आले.
या भेटीनंतर युगेंद्र पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत बारामतीतील परिस्थितीबाबत आपली भूमिका मांडली. शहरातील शांतता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रभावी पावले उचलण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
"बारामतीमध्ये वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनला आहे. कोयता गॅंग बारामती मध्ये सक्रिय झालंी आहे. मुलींची छेडछाड वाढलंीआहे. चक्क पोलिसांवरच गाडी घालण्याचा प्रकार आज घडला, पोलीसच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय?" असा सवाल युगेंद्र पवार यांनी उपस्थित केला.
"याबाबत आपण उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, बारामतीची कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना वेळ दिला पाहिजे, ही आपली भूमिका आहे. पोलिसांनी देखील कठोर पावले उचलण्याची गरज आहे," असे युगेंद्र पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, बारामतीतील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन कोणती ठोस पावले उचलणार आणि नागरिकांना पुन्हा सुरक्षिततेचा विश्वास कधी मिळणार, याकडे आता बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.