वाशिममध्ये जलस्रोतांची पडताळणी करण्याचे आदेश
पाणीटंचाई आणि चाराटंचाई रोखण्यासाठी प्रशासनाची धावपळ
जिल्हाधिकाऱ्यांनी आखले उपाययोजनांचे नियोजन
वाशिम: जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाण्याच्या स्रोतांची पडताळणी, बंद व नादुरुस्त स्रोतांची दुरुस्ती, पाणी उपलब्धतेनुसार नियोजन, चारा लागवड आणि रोजगार हमी योजनेंतर्गत कामे अशा विविध उपाययोजनांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा दालनात आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, रोहयो उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ तुषार बावणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी कुंभेजकर म्हणाले, मंगरूळपीर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विहिरी अधिग्रहित करण्यात येत असल्याने भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत तातडीने पडताळणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात.
अधिग्रहित विहिरींमधील पाणी किती महिने उपलब्ध राहू शकते, पाणी वितरण, पंपिंग व्यवस्था, पद्धती आणि पाण्याची पातळी यांची प्रत्यक्ष पाहणी करून नियोजन करावे. बंद अथवा नादुरुस्त पाणीपुरवठा स्रोत तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायतींनी प्राधान्याने कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केले.
दरवर्षी पाणीटंचाईच्या काळात विहिरी अधिग्रहित कराव्या लागणाऱ्या गावांतील पाणीविक्रीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार निर्बंध घालण्याबाबत कार्यवाही करावी. मोठ्याप्रमाणावर विहीर अधिग्रहण होणाऱ्या गावांची तालुकानिहाय माहिती व नकाशा तयार करावा.
कारंज्यातील लोहारा जवळील बोअरवेलला मोटार बसविण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून काम करता येईल का, याची तपासणी करावी. अवैध पाणीउपसा तातडीने बंद करण्यासाठी नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. 'व्हीबी-जो रामजी' योजनेंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध कामांची दवंडी व व्हॉट्सअॅपद्वारे व्यापक प्रसिद्धी करून इच्छुक मजुरांना कामाची मागणी नोंदविण्यास प्रोत्साहित करावे. कामांना तांत्रिक मान्यता देण्यास विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
वाशिम तालुक्यात सार्वजनिक कामांचे प्रस्ताव सादर करण्यास गती देण्याबरोबरच चारा लागवडीच्या कामांकडे विशेष लक्ष द्यावे. मंजुरी प्राप्त चारा लागवडीच्या कामांचा तातडीने शैल्फमध्ये समावेश करून पुढील कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी सांगितले. काढण्याच्या कामांसाठी संबंधित यंत्रणांना मशीन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार असून, इंधन व इतर अनुषंगिक खर्च संबंधित यंत्रणांनी करावा. त्यानुसार गाळ नियोजन करून गाळ काढण्याची कामे सुरू करावीत.
शेतकऱ्यांची चारा लागवडीसाठी नव्याने निवड करण्याची प्रक्रिया १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावी. तसेच, यासाठी कृषी विभागाने आवश्यक सहकार्य करावे. वनक्षेत्रातून 'कट अँड कॅरी' पद्धतीने चारा उपलब्ध करून घेणे, गाळपेर जमिनींची ग्रामस्तरावर यादी प्रसिद्ध करणे, इच्छुकांकडून अर्ज मागविणे तसेच अडाण घरणाच्या बुडीत क्षेत्रातील चारा लागवडीसाठी उपलब्ध जमिनींबाबत व्यापक प्रसिद्धी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी दिले.