CJP चे अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी LOC जारी (Photo - Social Media)
राजकारण

शिवाजी पार्क आंदोलन भोवलं! अभिजीत दीपके, आशुतोष रांका, सौरव दासविरोधात LOC जारी; मुंबई पोलिसांच्या कारवाईने खळबळ

CJP Lookout Circular: मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये परवानगीशिवाय आंदोलन केल्याप्रकरणी CJP च्या तीन प्रमुख नेत्यांविरोधात मुंबई पोलिसांनी लूकआउट सर्कुलर जारी केलं आहे. अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Vivek
  • शिवाजी पार्क आंदोलन भोवलं, CJP च्या तीन नेत्यांविरोधात LOC

  • गांधी जयंतीला परवानगी नाकारूनही आंदोलन, पोलिसांकडून FIR दाखल

  • लूकआउट सर्कुलर जारी करण्यामागचं कारण काय?

CJP Lookout Circular: मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कमध्ये परवानगीशिवाय आंदोलन करणं CJP पक्षाच्या प्रमुख नेत्यांना चांगलंच भोवलं आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आता मोठी कारवाई केली असून पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके आणि सह-संयोजक आशुतोष रांका यांच्याविरोधात लूकआउट सर्कुलर (LOC) जारी करण्यात आलं आहे. याआधी सह-संयोजक सौरव दास यांच्याविरोधातही LOC जारी करण्यात आलं होतं. त्यामुळे पक्षाच्या तीन प्रमुख नेत्यांवर पोलिसांची नजर असल्याचं स्पष्ट झालं आहे.

शिवाजी पार्क आंदोलन प्रकरण नेमकं काय?

गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर रोजी CJP कडून शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करण्यात आलं होतं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. मात्र, मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तरीही आंदोलन झाल्याने पोलिसांनी कारवाई केली.

या प्रकरणी 3 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. अभिजीत दीपके, सौरव दास, आशुतोष रांका यांच्यासह प्रणव अहिरे आणि अजिंक्य शिंदे यांचीही नावे गुन्ह्यात समाविष्ट आहेत. याशिवाय 400 ते 500 अज्ञात कार्यकर्त्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

सौरव दास यांना विमानतळावरच रोखलं

या प्रकरणातील सह-संयोजक सौरव दास यांना 23 नोव्हेंबर रोजी दिल्ली विमानतळावर लंडनला जाणाऱ्या विमानात चढण्यापासून रोखण्यात आलं होतं. त्यांच्या पासपोर्टमधील जन्मस्थान, शिक्षण, पत्ता आणि पालकांच्या तपशीलाबाबत विसंगती असल्याचं सांगत परराष्ट्र मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.

या कारवाईविरोधात दास यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. 26 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने न्यायालयात मुंबई पोलिसांच्या विनंतीवरून LOC जारी केल्याचं स्पष्ट केलं.

लूकआउट सर्कुलर म्हणजे नेमकं काय?

लूकआउट सर्कुलर म्हणजे संबंधित व्यक्तीच्या परदेश प्रवासावर लक्ष ठेवण्यासाठी जारी करण्यात येणारा अधिकृत अलर्ट. तपास यंत्रणेच्या विनंतीनुसार इमिग्रेशन विभागाला याची माहिती दिली जाते.

अशा व्यक्तीने विमानतळ, बंदर किंवा सीमा तपासणी केंद्रावरून देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित यंत्रणेला अलर्ट मिळतो. LOC जारी झालं म्हणजे संबंधित व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीत अटक होणारच, असं नाही. त्यातील निर्देशांनुसार व्यक्तीला रोखलं जाऊ शकतं किंवा तपास यंत्रणेला माहिती दिली जाऊ शकते.

आता या प्रकरणात मुंबई पोलीस पुढे काय कारवाई करतात आणि CJP चे संबंधित नेते काय भूमिका घेतात, याकडे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

धुक्याचा कहर रोखण्यासाठी वाशिम पोलीस अलर्ट! महामार्गावर गस्त अन् विशेष उपाययोजना, वाहनचालकांना सतर्कतेचे आवाहन

Bopdeo Ghat Accident प्रकरणात मोठी बातमी; चालकाला कोर्टाने थेट...; वाचा सविस्तर

Kho Kho Championship : चार गुणांनी हुकले सुवर्ण! कर्नाटककडून महाराष्ट्राचा सलग दुसऱ्या वर्षी पराभव

Winter Health: थंडीत सकाळी अंथरुणातून उठण्याची इच्छा होत नाही? Winter Blues ची 'ही' लक्षणे दुर्लक्षित करू नका

Rohit Pawar : आधी सुनेत्रा पवारांची माफी मागितली, मग अजितदादांबाबत मोठं विधान! रोहित पवार म्हणाले, 'त्यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही'