मनोज जरांगे पाटील यांचे योगेश कदम यांना सडेतोड उत्तर
कथित एकनाथ शिंदे यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवरून शाब्दिक वाद
योगेश कदम यांच्या आरोपांवर जरांगे पाटील यांचे उत्तर
Manoj Jarange Patil vs Yogesh Kadam : जालना : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी कथित ५०० कोटींच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ऑडिओ क्लिप समोर आणल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत पैसे घेतल्याचा कथित दावा यामध्ये करण्यात आला होता. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. यावर आता जरांगे पाटलांनी उत्तर दिले.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मनोज जरांगे सुपारी घेऊन काम करत असल्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले, "मराठा समाजासाठी आमच्या सरकारने घेतलेले निर्णय इतिहासात कधीही घेतले गेले नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा जरांगेंचा प्रयत्न आहे. आता त्यांची दिशा भरकटली आहे. जरांगेंचा उद्देश मराठा समाजाच्या हिताचा दिसत नाही," अशी टीका योगेश कदम यांनी केली होती.
मनोज जरांगे पाटील यांनी जालनामध्ये माध्यमांशी संवाद साधताना उत्तर दिले. ते म्हणाले, “मराठा समाजाला कोणता निर्णय समाजाच्या हिताचा आहे आणि कोणता नाही, हे चांगलेच समजते. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करायचे ठरवले असते, तर त्यांना एवढ्या उंचीवर नेले नसते. तुम्ही सुपाऱ्या घ्यायला लागलात, आम्ही नाही. तुम्ही स्वतःच आपल्या समाजाचे नुकसान करायला निघाला आहात.”
पुढे जरांगे पाटील म्हणाले, “याची किंमत योग्य वेळी मोजावी लागेल, कारण शिंदे साहेबांना मोठे करण्यात मराठा समाजाचा मोठा वाटा आहे. तुमचेच काही आमदार, खासदार आणि मंत्री शिंदे साहेबांची प्रतिमा खालावण्याचे काम करत आहेत.”
Political News : 'संदीप देशपांडेंच्या व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी करा...'; निलेश राणेंची मागणी
मनोज जरांगे पाटील यांनी रामदास कदम यांच्यावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “रामदास भाई, तुम्ही जितके या प्रकरणात पडाल, तितके तुम्ही आणि शिंदे साहेब अडचणीत याल. मी पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच ही ऑडिओ क्लिप तुमच्याकडे आली होती, याचे पुरावे माझ्याकडे आहेत. क्लिप तुमच्याकडे आल्यानंतर ती शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही 'जोशी' नावाच्या व्यक्तीला फोन केला होता. मला क्लिप देणारी व्यक्ती आणि रामदास कदम यांना क्लिप देणारी व्यक्ती एकच असण्याची शक्यता आहे. या 'जोशी' नावाच्या व्यक्तीची भूमिका या प्रकरणात नव्याने समोर आली आहे. पत्रकार परिषद घेण्याच्या दोन दिवस आधीच त्याच्याकडे ही क्लिप कुठून आली, याची माहिती माझ्याकडे आहे.”
योगेश कदम यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर काय आरोप केला होता?
मनोज जरांगे पाटील हे सुपारी घेऊन काम करत असल्याचा आरोप गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केला होता. तसेच एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही त्यांनी केली होती.
योगेश कदमांच्या आरोपांना मनोज जरांगे पाटील यांनी काय उत्तर दिले?
योगेश कदमांच्या आरोपांना मनोज जरांगे पाटील यांनी काय उत्तर दिले?
“तुम्ही सुपाऱ्या घ्यायला लागलात, आम्ही नाही. तुम्ही स्वतःच आपल्या समाजाचे नुकसान करायला निघाला आहात,” असे प्रत्युत्तर मनोज जरांगे यांनी दिले. तसेच शिंदे यांना मोठे करण्यात मराठा समाजाचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी म्हटले.
मनोज जरांगे पाटील यांनी रामदास कदम यांच्याबाबत काय दावा केला?
पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच कथित ऑडिओ क्लिप रामदास कदम यांच्याकडे आली होती, असा दावा जरांगे यांनी केला. ही क्लिप एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 'जोशी' नावाच्या व्यक्तीला फोन करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले.