ठाण्यात काँग्रेसकडून भव्य संविधान बचाव रॅलीचं आयोजन
हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपवर मनुस्मृती आणि संविधानाच्या मुद्द्यावरून टीका
देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी
Congress Samvidhan Bachav Rally: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा संविधानाचा मुद्दा तापला आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसने ठाण्यात भव्य संविधान बचाव रॅली काढली. या रॅलीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. विशेष म्हणजे, पुण्यात न्यायालयाच्या आवारात झालेल्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात, नसीम खान यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते या रॅलीत सहभागी झाले होते. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी सपकाळ यांनी उपस्थितांना संविधान बचावाची शपथही दिली.
डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी संविधानाने देशातील सर्व जाती-धर्मांना समान अधिकार दिल्याचं सांगितलं. मात्र, केंद्र सरकारकडून सामान्य नागरिकांचे अधिकार कमी करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. संविधानाचं रक्षण झालं तरच देशाचं रक्षण होईल, असंही ते म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपच्या संविधानाविषयीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. मनुस्मृती आणि 'बंच ऑफ थॉट्स'ला महत्त्व देणाऱ्या भाजपला आता संविधानाची आठवण होत आहे, ही केवळ पुतणा मावशीचं प्रेम असल्याची टीका त्यांनी केली.
भाजप सरकार संविधान आणि लोकशाहीची पायमल्ली करत असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. ठाण्यातूनच संविधानाच्या रक्षणाचा संदेश देण्यासाठी ही रॅली आयोजित केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
पुण्यात न्यायालयाच्या आवारात झालेल्या हल्ल्याच्या घटनेवरून सपकाळ यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं. पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, असा आरोप त्यांनी केला.
गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरल्याचा दावा करत त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
सतेज पाटील यांनी लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी जनतेने एकत्र येण्याचं आवाहन केलं. तर बाळासाहेब थोरात यांनी समता आणि बंधुतेच्या विचारांचं महत्त्व अधोरेखित केलं.
नसीम खान यांनीही संविधानाने दिलेल्या समान अधिकारांवर गदा आणली जात असल्याचा आरोप केला. त्यामुळे ठाण्यातील या रॅलीच्या माध्यमातून काँग्रेसने संविधान, लोकशाही आणि कायदा-सुव्यवस्थेचे मुद्दे केंद्रस्थानी आणले आहेत.