नाणेफेक ओडिशाची; महाराष्ट्राच्या आक्रमणाचा धडाका
दुसऱ्या डावातही महाराष्ट्राची पकड मजबूत
महाराष्ट्राच्या खेळाडूंची अष्टपैलू चमक
Junior National Kho Kho Championship : आक्रमणाचा वेग, संरक्षणातील संयम आणि सांघिक ताकदीची अभेद्य भिंत. या त्रिसूत्रीच्या जोरावर महाराष्ट्राच्या मुलींनी 45 व्या ज्युनियर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदकावर दिमाखात मोहोर उमटवली. अंतिम सामन्यात ओडिशाला 27-19 अशा आठ गुणांनी नमवत महाराष्ट्राने आपले 27 वे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले.
विशेष म्हणजे, महाराष्ट्राच्या मुलींनी सलग 12 व्या विजेतेपदाची ऐतिहासिक कामगिरी नोंदवत राष्ट्रीय खो-खोवरील आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा अधोरेखित केले. बोनस गुणांसह पहिल्या डावात उभारलेली आघाडी आणि दुसऱ्या डावात कायम राखलेली पकड यामुळे महाराष्ट्राने सुवर्णविजयाची संधी कोणत्याही क्षणी हातातून जाऊ दिली नाही.
नाणेफेक ओडिशाची; महाराष्ट्राच्या आक्रमणाचा धडाका
विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात ओडिशाने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण स्वीकारले. महाराष्ट्राने आक्रमणाची संधी साधत सुरुवातीपासूनच वेगवान खेळ केला. पहिल्या डावात 12 गुण आणि 3 बोनस गुणांची कमाई करत एकूण 15 गुण नोंदवले. महाराष्ट्राच्या आक्रमणापुढे ओडिशाला पहिल्या डावात केवळ 6 गुणांवर समाधान मानावे लागले. पहिल्याच डावात महाराष्ट्राने निर्माण केलेली ही आघाडी सामन्याच्या निकालाच्या दृष्टीने निर्णायक ठरली.
दुसऱ्या डावातही महाराष्ट्राची पकड मजबूत
पहिल्या डावातील आघाडी मिळाल्यानंतर महाराष्ट्राने दुसऱ्या डावातही खेळावरील पकड सैल होऊ दिली नाही. आक्रमणात 10 गुणांची कमाई करत विजयाच्या दिशेने आणखी एक भक्कम पाऊल टाकले. ओडिशानेही दुसऱ्या डावात 10 गुण मिळवत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; मात्र पहिल्या डावातील पिछाडी भरून काढणे त्यांना शक्य झाले नाही. या डावात महाराष्ट्राने 2, तर ओडिशाने 3 बोनस गुण मिळवले. परिणामी महाराष्ट्राने 27-19 अशी आठ गुणांची विजयी आघाडी कायम राखत सुवर्णपदकावर कब्जा केला.
महाराष्ट्राच्या खेळाडूंची अष्टपैलू चमक
महाराष्ट्राच्या विजयात आक्रमण आणि संरक्षण या दोन्ही आघाड्यांवर खेळाडूंनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्नेहा लामकाने (2.30 मि. संरक्षण व 6 गुण), धनश्री कंक (2 मि. संरक्षण व 4 गुण), मैथिली पवार (1.30 मि. संरक्षण व 6 गुण), अनुष्का ताम्हाणे (1.20 मि. व 2.10 मि. संरक्षण), श्वेता नवले (1.40 मि. संरक्षण), गुड्डी राठोड (1.10 मि. संरक्षण) आणि प्रणिती जगदाळे (4 गुण) यांनी प्रभावी खेळ करत महाराष्ट्राच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आक्रमणातील गुणांची बरसात आणि संरक्षणातील भक्कम कामगिरी यामुळे महाराष्ट्राने सामन्यावर आपली पकड कायम ठेवली.
ओडिशाच्या खेळाडूंनीही प्रतिकाराची पराकाष्ठा केली. तृप्तीरेखा बारीक (1.30 मि. संरक्षण व 4 गुण), सुभाश्री मल्लिक (1.25 मि. संरक्षण व 4 गुण), लिसारानी रैना (1.30 मि. व 1.20 मि. संरक्षण), चिन्मयी प्रधान (1.00 मि. संरक्षण व 2 गुण), रक्तिमा भांडा (2.05 मि. संरक्षण व 2 गुण), कादिला मेनका (1.05 मि. संरक्षण व 2 गुण) आणि सुभालक्ष्मी नाथा (1.05 मि. संरक्षण) यांनी चांगली कामगिरी केली. मात्र महाराष्ट्राच्या आक्रमणाचा वेग आणि सांघिक समन्वय रोखण्यात त्यांना यश आले नाही.
महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव या विजयाबाबत म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुलींनी ओडिशाविरुद्ध मिळवलेला विजय हा त्यांच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि उत्कृष्ट सांघिक समन्वयाचा परिणाम आहे. आक्रमण आणि संरक्षण या दोन्ही आघाड्यांवर खेळाडूंनी आत्मविश्वासाने आपली क्षमता सिद्ध केली.
सलग 12 वे आणि एकूण 27 वे राष्ट्रीय विजेतेपद मिळवणे ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. खेळाडू, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाचे मी मनापासून अभिनंदन करतो. आगामी स्पर्धांमध्येही महाराष्ट्राच्या मुली अशीच विजयी घोडदौड कायम ठेवतील, असा विश्वास आहे.