मुंबई इंडियन्स आज संध्याकाळपर्यंत करणार कर्णधाराच्या नावाची घोषणा
रोहित शर्माचे नाव शर्यतीत पुढे
रोहित शर्मा ही धुरा सांभाळणार का?
Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा संघ गेल्या २ वर्षापासून आयपीएलमध्ये चुकीच्या गोष्टीसाठी गाजताना दिसत आहे. ५ वेळा चॅम्पियन असणारा हा संघ आज संध्याकाळपर्यंत नव्या कर्णधाराचे नाव घोषित करणार आहे. अजूनही आयपीएल सुरू होण्यासाठी किमान ५-६ महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. पण सर्व संघांची तयारी जोमात सुरू झाली आहे. तसं तर हार्दिक पांड्या आता मुंबई इंडियन्समधून निघून गेला आहे पण २७ नोव्हेंबर या तारखेशी मात्र त्याचे खास कनेक्शन आहे.
दरम्यान आज कर्णधाराच्या या घोषणेत रोहित शर्माने पुन्हा मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळावी अशीच चाहत्यांना अपेक्षा आहे आणि इच्छादेखील. १६ डिसेंबरला आयपीएल २०२७ च्या होणाऱ्या मिनी लिलावापूर्वी आता या कर्णधाराची घोषणा होईल.
आयपीएल २०२७ च्या आधी हार्दिक पांड्याने तीन वर्ष मुंबई इंडियन्ससह घालवली असून आता रिटेन्शनच्या आधीच त्याचे ट्रेड झाले आणि पंजाब किंग्जच्या संघात तो सामील झाला आहे. त्याच्याऐवजी पंजाबमधून अर्शदीप सिंह मुंबई इंडियन्समध्ये आला आहे. आता या नव्या हंगामात अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह हे दोघेही मुंबई इंडियन्ससाठी ढाल होऊन खेळताना दिसतील.
दरम्यान संघाकडून सोशल मीडियावर २७ नोव्हेंबरच्या संध्याकाळी मुंबई इंडियन्सच्या नव्या कर्णधाराची घोषणा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मजेशीर गोष्ट ही आहे की, २७ नोव्हेंबर रोजीच ३ वर्षापूर्वी २०२३ मध्ये हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स संघात पुनरागमन केले होते. पण हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाच्या काळात मुंबई इंडियन्स चांगली कामगिरी करू शकली नाही आणि इतकंच नाही तर फायनलचं स्वप्नं तर दूरच, शेवटच्या चार संघातही स्थान मिळवता आले नाही.
मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार नक्की कोण? याची आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. तर याभोवती उत्कंठादेखील वाढू लागली आहे. तसं तर संघाजवळ सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा या तिन्ही खेळाडूंचाही पर्याय आहे, मात्र रोहित शर्माला पुन्हा ही कर्णधारपदाची धुरा सोपवली जाईल असा कयास चाहते लावत आहेत. मात्र ही केवळ चर्चा आहे. याचा खुलासा आज संध्याकाळी होईल. यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ पुन्हा जोमाने उभा राहील का आणि या नव्या हंगामात कशी कामगिरी करेल याचीच आता चाहत्यांना उत्सुकता आहे.