क्रीडा संकुलांसाठी निधी उपलब्ध करणार
खासदार क्रीडा संग्रामची सुरुवात
राही सरनोबतची मदत
Thane District Sports Complex : ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या परिसरात क्रीडा गुणवत्तेला चालना देण्यासाठी क्रीडा सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या जागा शोधून तिथे विविध खेळांसाठी क्रीडा संकुले उभारणार आहोत, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. अंबरनाथमधील नेताजी सुभाषचंद्र बोस खुल्या क्रीडा संकुलाचे लोकार्पण केल्यानंतर शिंदे यांनी ही योजना सांगितली.
अंबरनाथमधील क्रीडा सुविधांमध्ये मोलाची भर घालणाऱ्या विविध क्रीडा प्रकल्पांचा शुभारंभ डॉ. शिंदे यांच्या हस्ते झाला. नेताजी सुभाषचंद्र बोस खुल्या क्रीडा संकुलातील 400 मीटर धावपट्टी, अॅथलेटिक्सच्या सुविधा तसेच हॉकी आणि फुटबॉलचे मैदान खुले करण्यात आले.
ऑलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावाचे तसेच क्रिकेट मैदानाचे भूमिपूजनही झाले. यावेळी डॉ. शिंदे यांनी खेळाडूंशी संवाद साधला. नेमबाजी रेंज अधिक अत्याधुनिक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेल्या जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्याची गणना होते. या जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक क्रीडा सुविधा देण्याची योजना तयार आहे. त्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. क्रीडा सुविधा उभारण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागांचे समूह निश्चित करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात अनेक खेळांसाठी सुविधा निर्माण करता येतील, असे डॉ. शिंदे यांनी निवडक पत्रकारांना सांगितले.
आम्ही नुकताच ठाणे जिल्ह्यातील नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर क्रीडा सुविधा आणि क्रीडा संकुले उभारण्यासाठीही निधी उपलब्ध होऊ शकेल, असेही त्यांनी नमूद केले.
खासदार क्रीडा संग्राममध्ये 32 खेळांत 75 हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्यातून दोन हजार विजेते गवसतील. हा एक प्रकारे क्रीडा गुणवत्तेचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. यात चांगली कामगिरी करणाऱ्यांना भविष्यातही मदत नक्कीच केली जाईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने विविध सुविधा तयार होत आहेत. नेताजी सुभाषचंद्र क्रीडा संकुलातील बॅडमिंटन, स्क्वाश, जिम्नॅस्टिक यासारखे इनडोअर खेळही सुरू होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलाचे काम सुरू आहे. खंबाळपाडा तसेच कळव्यातही क्रीडा संकुले तयार होत आहेत.
कळव्यातील खारजमिनीवर बालेवाडीच्या धर्तीवर क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी केंद्रीय मंत्रालयांशी चर्चा सुरू आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
खासदार क्रीडा संग्रामच्या निमित्ताने प्रथितयश खेळाडूंनी स्पर्धेला भेट द्यावी, यासाठी त्यांना निमंत्रित केले असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. विश्वचषक पदकविजेती नेमबाज राही सरनोबत सोमवारी अंबरनाथला आली होती. अंबरनाथमधील शूटिंग रेंज अधिक अत्याधुनिक करण्यासाठी राही सरनोबत यांच्याकडून सूचना मागवल्या आहेत, असे डॉ. शिंदे यांनी नमूद केले.
या रेंजद्वारे परिसरातील नेमबाजांना माफक दरात नेमबाजीमध्ये कारकीर्द घडवण्याची संधी मिळत आहे. नगरपालिका शाळांमधील मुलांना येथे मोफत सुविधा दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.