सुदान , सोमालिया आणि येमेनमध्ये सर्वाधिक धोका
एल निनोमुळे शेतीला फटका; आफ्रिकेत अन्नटंचाई वाढण्याची भीती
मदतीसाठी निधीत मोठी घट; लाखो नागरिकांचे भविष्य धोक्यात
Breaking News : जगभरातील अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनण्याची शक्यता आहे . संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने ( FAO ) आणि जागतिक अन्न कार्यक्रमाने आगामी सहा महिन्यांसाठी धोक्याचा इशारा दिला आहे .
डिसेंबर २०२६ ते मे २०२७ या काळात जगातील १६ संवेदनशील भागांमध्ये उपासमारीची परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते . आफ्रिकेतील काही देशांमध्ये दुष्काळ आणि भीषण अन्नटंचाईचा धोका निर्माण झाला आहे . मागील अहवालात १३ भागांचा समावेश होता . आता ही संख्या वाढून १६ झाली आहे .
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार सुदान , दक्षिण सुदान , सोमालिया , नायजेरियाचे काही भाग आणि येमेन या पाच ठिकाणी उपासमारीचा धोका सर्वाधिक आहे . या देशांमधील युद्ध , सशस्त्र संघर्ष , नागरिकांचे विस्थापन आणि आर्थिक संकटामुळे अन्नपुरवठा विस्कळीत झाला आहे .
सुदानमधील उत्तर दारफूर आणि दक्षिण कोर्दोफानमधील १३ भागांमध्ये जानेवारी २०२७ पर्यंत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे . दक्षिण सुदानमधील काही भागातही दुष्काळाचा धोका कायम आहे .
हवामानातील बदल आणि एल निनोच्या प्रभावामुळे आफ्रिकेतील शेतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे . दक्षिण आफ्रिकेतील काही देशांमध्ये कमी पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे .
झिम्बोंबे मधील ३० लाख , मलावितील २६ लाख आणि मोझाम्बिक मधील १८ लाख लोकांना आगामी काळात तीव्र अन्नटंचाईचा सामना करावा लागू शकतो . मध्य अमेरिकेतील ड्राय कॉरिडॉरमध्येही दुष्काळामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे .
उपासमारीच्या संकटाला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या मानवतावादी मदतीच्या निधीतही मोठी घट आहे . सर्वाधिक धोक्यात असलेल्या पाच भागांमधील अन्नसुरक्षा आणि पोषणासाठी मिळणार निधी २०२२ मधील ५.१ अब्ज डॉलरवरून २०२५ मध्ये २ अब्ज डॉलरवर आला आहे . म्हणजेच मदतीच्या निधीत ६२ टक्क्यांची घट झाली आहे .
यामुळे अन्नधान्य , शेतीसाठी लागणारे साहित्य आणि गरजू कुटुंबाना मदत पोहोचवण्याच्या प्रयत्नांवर परिणाम होत आहे . FAO आणि WFP यांनी आंतराष्ट्रीय समुदायाला तातडीने मदत वाढवण्याचे आणि प्रभावित नागरिकांपर्यंत अडथळ्याशिवाय मदत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे .