इ२० इंधन फायद्याचे की नुकसानीचे? (फोटो- istockphoto)
सुनयना सोनवणे/पुणे: भारत सरकारने २०३० पर्यंत इथेनॉल मिश्रण वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जेणेकरून पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होईल, प्रदूषण घटेल आणि शेतकऱ्यांना नवा बाजार मिळेल. पण या इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांवर परिणाम होत असल्याची तक्रार शहरातील नागरिक करत आहेत.
हे इ२० म्हणजे पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल आणि ८०% पेट्रोल असे मिश्रण. इथेनॉल हे ऊस, मका, ज्वारी यांसारख्या पिकांपासून मिळणारे बायोफ्युएल आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार इ२० इंधनामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल पेट्रोल वरील खर्च घटेल आणि शेतकऱ्यांसाठी नवीन उत्पन्न स्त्रोत निर्माण होतील.
मात्र जुन्या गाड्यांमध्ये फ्युएल इंजेक्टर, पंप व सील्सहे तांबे, पितळ किंवा जुन्या रबरपासून बनलेले असल्याने इथेनॉलमुळे ते पटकन गंजतात किंवा खराब होतात. इथेनॉल पाणी शोषून घेतो, त्यामुळे गंजण्याची प्रक्रिया आणखी वेगाने होते. यामुळे फ्युएल लाईन व इंजेक्टरमध्ये अडथळे निर्माण होतात. परिणामी इंजिनचे कार्यक्षमता व आयुर्मान कमी होते. यासंदर्भात नागरिक, गॅरेजवाले, तसेच तज्ञांसोबत बोलताना मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाली.
Navarashtra Special: सौंदर्यवर्धनाच्या आड पर्यावरणाला धोका: कोनोकोर्पस झाडांवर बंदीची गरज
‘नवीन वाहने इ२० साठी तयार केली जात आहेत. त्यामुळे मोठा धोका नाही. मात्र जुनी वाहने या मिश्रणाचे जुळवून घेऊ शकतील का, हा खरा प्रश्न आहे.’
-ऑटोमोबाईल इंजिनिअर
‘आमच्याकडे काही वाहने आली आहेत, ज्यात इंजिनच्या पाईप्स गंजल्याची समस्या दिसली. त्यामुळे आता लोकांना वारंवार वाहनांची देखभाल करावी लागेल.’
-वाहन दुरुस्ती कामगार.
‘उसाला मोठ्या प्रमाणात मागणी मिळाल्यास आमच्यासाठी चांगलेच आहे. मात्र पाण्याच्या प्रश्नासाठी योग्य त्या उपायोजना कराव्या लागतील.’
-शेतकरी.
‘प्रदूषण कमी होणे ही चांगलीच गोष्ट आहे. इथेनॉलवाल्या पेट्रोलमुळे कमी मायलेज, जास्त मेंटेनन्स असे होत आहे. त्यामुळे रोजच्या खर्चावर परिणाम होईल.’
-नागरिक.
फायदे काय?
१. कार्बन डाय-ऑक्साइड आणि कार्बन ऑक्साईड चे उत्सर्जन १५ ते २० टक्क्यांनी कमी होऊन एकूण कार्बन उत्सर्जनात घट होईल.
२. पेट्रोलची आयात कमी होईल त्यामुळे परिके चलनाची बचत होईल.
३. उस मका यासारख्या धान्यांना नवी बाजारपेठे मिळेल. याचा शेतकऱ्यांना फायदा होईल.
४. नवीकरणीय स्त्रोतांचा वापर झाल्यामुळे पर्यावरण पूरक असे हे इंधन असणार आहे.
संभाव्य परिणाम काय?
नकारात्मक परिणामांची भीती जास्त आहे. या इंधनाच्या वापरामुळे नायट्रोजन ऑक्साईड्सचे हवेतले प्रमाण वाढू शकते. ज्यामुळे धुरकटपणा, श्वसनाचे आजार होऊ शकतात. उसाच्या शेतीसाठी जास्त पाणी लागल्याने पाण्याचा उपलब्धीचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. इंधनासाठी धान्य वापरल्यास अन्नधान्याच्या किमतीत वाढ होऊ शकते.