इटालियन वाहन उत्पादक कंपनी ‘पियाजियो’ भारतीय दुचाकी बाजारात आपल्या विस्तारासाठी एक मोठी योजना घेऊन येत आहे. कंपनीने भारतीय ग्राहकांच्या गरजा आणि वापर लक्षात घेऊन खास ‘मेड-इन-इंडिया’ कम्युटर स्कूटर्सची नवीन रेंज विकसित करण्याची घोषणा केली आहे. या मालिकेतील पहिली स्कूटर २०२७ च्या पहिल्या सहामाहीत बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.
प्रीमियम सेगमेंटकडून ‘मास-मार्केट‘कडे प्रवास
आतापर्यंत पियाजियो भारतात आपल्या ‘वेस्पा’ या ब्रँडअंतर्गत प्रीमियम आणि लक्झरी स्कूटर्सची विक्री करत आली आहे. मात्र, आता कंपनी आपले लक्ष भारतातील सर्वात मोठ्या ‘कम्युटर सेगमेंट’वर सामान्य ग्राहकांसाठीच्या स्कूटर्स केंद्रित करत आहे. एकाच ब्रँडअंतर्गत वेगवेगळ्या फीचर्स आणि बजेटनुसार अनेक मॉडेल्स सादर केली जातील, ज्यामुळे विविध ग्राहकवर्गाला आकर्षित करणे शक्य होईल.
भारतीय रस्त्यांसाठी खास नवीन प्लॅटफॉर्म
या नवीन स्कूटर्स एका नवीन प्लॅट फॉर्मवर आधारित असतील, जो खास भारतासाठी तयार केला जात आहे. या धोरणात्मक बदलामुळे पियाजियोला उत्पादन खर्च नियंत्रणात ठेवता येईल आणि भारतीय ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार उत्पादने बनवता येतील.

दिग्गज स्कूटर्सशी होणार थेट सामना
भारतात कम्युटर स्कूटर सेगमेंटमध्ये आधीच मोठी स्पर्धा आहे. पियाजियोच्या या नवीन स्कूटर्सची थेट स्पर्धा बाजारात दबदबा असलेल्या होंडा अॅक्टिव्हा, टीव्हीएस जुपिटर आणि सुझुकी अॅक्सेस यांसारख्या लोकप्रिय स्कूटर्सशी असेल. भक्कम डीलर नेटवर्क, विश्वासार्ह इंजिन आणि उत्तम रीसेल व्हॅल्यू असलेल्या या गाड्यांशी स्पर्धा करण्यासाठी पियाजियोला आपल्या स्कूटर्सची किंमत अत्यंत स्पर्धात्मक ठेवावी लागेल.
Ather EL: एथरची नवी बजेट फॅमिली स्कूटर २९ ऑगस्ट रोजी बाजारात येणार! जाणून घ्या
पुण्याजवळील बारामती प्लांटमध्ये होणार निर्मिती
या नवीन स्कूटर्सचे उत्पादन पियाजियोच्या बारामती येथील कारखान्यात केले जाईल. या प्लांटमध्ये पुरेशी क्षमता उपलब्ध असल्याने कंपनीला नवीन कारखान्यासाठी मोठा अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. सुरुवातीला या स्कूटर्स प्रामुख्याने भारतीय बाजारासाठी असतील, परंतु भविष्यात आफ्रिकेसारख्या इतर देशांमध्ये त्यांची निर्यात केली जाऊ शकते.
पियाजियोसाठी २०२७ मधील हे लाँचिंग भारतातील प्रवासातील एक नवीन अध्याय ठरू शकते. परवडणारी किंमत, विश्वासार्हता आणि मजबूत सर्व्हिस नेटवर्क या तीन गोष्टींवरच पियाजियोचे या सेगमेंटमधील यश अवलंबून असेल.






