भारतीय ऑटो बाजारात दरवर्षी अनेक गाड्या येतात आणि जातात. काहीना जनमानसाकडून लोकप्रियता मिळते, तर काहीना आपले गेलेले भांडवलही काढता येत नाही. या दोन्ही परिस्थितींच्या मधली एक गोष्ट आहे ती म्हणजे टाटा नॅनो कारची. 2008 मध्ये रतन टाटा यांनी ‘जगातील सर्वात स्वस्त कार’ म्हणून टाटा नॅनो सदर केली. त्यांचे स्वप्न होते की दुचाकीवर प्रवास करणाऱ्या भारतीय कुटुंबांना परवडणारी चारचाकी मिळावी. मात्र मोठी चर्चा आणि उत्सुकता निर्माण होऊनही नॅनोला अपेक्षित यश मिळाले नाही आणि चुकीच्या लोकप्रियतेमुळे ही कार बाजारात तग धरू शकली नाही. आज आपण सविस्तरपणे पाहूयात टाटा नॅनो भारतीय बाजारपेठेत अयशस्वी का ठरली ते,
1.’जगातील सर्वात स्वस्त कार’ ही जाहिरात
टाटा मोटर्सने नॅनोची ओळख “World’s Cheapest Car” म्हणून केली. पण भारतीय ग्राहकांसाठी कार ही केवळ वाहतूक साधन नसून प्रतिष्ठेचे प्रतिक असते, या गोष्टीपासून ते अनभिज्ञ राहिले. त्यामुळे अनेकांना ‘स्वस्त कार’ चालवण्यापेक्षा थोडे जास्त पैसे देऊन दुसरी कार घेणे पसंत होते.
Tata Motors: ‘या’ कार्सवर मिळतेय तब्बल 30 ते 55 हजारांची सवलत …
2.ग्राहकांनी घेतलेला चुकीचा अर्थ
नॅनो मुख्यतः दुचाकी वापरणाऱ्या कुटुंबांसाठी तयार करण्यात आली होती. मात्र भारतीय ग्राहकांना फक्त स्वस्त कार नव्हे, तर प्रगती आणि सामाजिक प्रतिष्ठा दर्शवणारी कार हवी होती. त्यामुळे अनेकांनी नॅनो शिवाय इतर नवीन आलेल्या कारची निवड केली.
3.सुरक्षेबाबत असलेली चिंता
टाटा नॅनो बाजारात आल्यानंतर काही नॅनो गाड्यांना आग लागल्याच्या घटना समोर आल्या. या घटना अगदी काही आणि किरकोळ असल्या तरी त्या वाऱ्यासारख्या पसरल्या. ग्राहकांना त्यामुळे गाडीच्या सुरक्षिततेबद्दल शंका येऊ लागल्या. परिणामी गाडीच्या विक्रीमध्ये तुफान घट झाली.
Tata Motors कडून भारतातील सर्वात किफायतशीर चार-चाकी मिनी-ट्रक लाँच …
4.मोजके फीचर्स आणि साधी रचना
कमी खर्चात गाडी बनवण्यासाठी सुरुवातीच्या मॉडेल्समध्ये बरेच कॉस्ट कटिंग करण्यात आले होते. मात्र यामुळे ग्राहकांचा असा ग्रह झाला कि, यापेक्षा थोडे जास्त पैसे देऊन चांगले फीचर्स असणारी कार घेणे जास्त सोयीचे होईल.
5.उत्पादनातील वेळ आणि वाढती स्पर्धा
नॅनोचे उत्पादन करणारा कारखाना पश्चिम बंगालमधील सिंगुर प्रकल्पावरील वादामुळे गुजरातमधील सानंद इथे हलवावा लागला. यामुळे उप्त्पादानात विलंब झाला आणि परिणामी वितरणात; यामुळे लोकांमधील नॅनो साठीचा उत्साहही कमी झाला.
बाजारामध्ये मारुती 800, ऑल्टो आणि इतर एंट्री-लेव्हल कारनी नॅनोसमोर मोठे आव्हान निर्माण केले होते. ग्राहकांना थोड्या जास्त किमतीत अधिक विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित पर्याय उपलब्ध असल्याने त्यांनी नॅनोचा विषय सोडून दिला.
थोडक्यात काय तर, टाटा नॅनो ही इंजिनीअरींगच्या आणि समाजाच्या दृष्टीने एक चांगली आणि समाजसेवी कल्पना होती, परंतु उत्पादनापेक्षा तिचे मार्केटिंग आणि ब्रँडिंग अपयशी ठरले. “सर्वात स्वस्त कार” ही प्रतिमा ग्राहकांच्या अपेक्षांशी जुळली नाही. त्यामुळे नॅनो हे भारतीय ऑटोमोबाईल इतिहासातील एक महत्त्वाचे पण व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरलेले उदाहरण समजले जाते.






