फोटो सौजन्य: iStock
टोयोटा किर्लोस्कर मोटरने ऑगस्ट 2025 महिन्यातील विक्रीचे आकडे जाहीर केले असून, या कालावधीत कंपनीने एकूण 34,236 युनिट्सची विक्री केली आहे. मागील वर्षी याच कालावधीत विक्री झालेल्या 30,879 युनिट्सच्या तुलनेत यंदा कंपनीच्या विक्रीत तब्बल 11% वाढ झाली आहे. या विक्रीत देशांतर्गत बाजारपेठेतील 29,302 युनिट्स तसेच 4,934 युनिट्सच्या निर्यात विक्रीचा समावेश आहे.
गेल्या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट 2024 या कालावधीत कंपनीने 2,12,785 युनिट्स विकले होते. तर यावर्षी त्याच कालावधीत विक्रीत 14% वाढ होत 2,41,696 युनिट्सची नोंद झाली आहे. ही सातत्यपूर्ण वाढ टोयोटाच्या भारतातील स्थिर उपस्थितीचे तसेच ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतिबिंब मानली जाते.
5 स्टार सेफ्टी अन् 27 किमीचा मायलेज त्यात सनरूफची सोबत! ‘या’ बेस्ट कारचा सगळीकडे बोलबाला
कंपनीच्या युज्ड कार बिझनेसच्या विक्री व सेवेचे उपाध्यक्ष वरिंदर वाधवा म्हणाले, “आम्ही ऑगस्ट 2025 मध्ये 34,236 युनिट्सची विक्री करून महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. ग्राहकांचा आमच्या कार व सेवांवरील सातत्यपूर्ण विश्वास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. सप्टेंबर महिना संपूर्ण उद्योगासाठी महत्त्वाचा टप्पा असेल. आम्ही बाजारातील नव्या ट्रेंड्सचे बारकाईने निरीक्षण करत आहोत. टोयोटामध्ये आम्ही नाविन्य आणण्यावर आणि सणासुदीच्या काळात मूल्यवर्धित सेवा सादर करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आमचा विश्वास आहे की यामुळे ग्राहक समाधानात वाढ होईल आणि त्यांचे खरेदी निर्णय अधिक सोपे व आनंददायी ठरतील.”
ऑगस्ट महिन्यात टोयोटाने काही विशेष उपक्रमांमुळेही लक्ष वेधले. मेक-इन-इंडियाला अधिक चालना देण्यासाठी आणि निर्यात क्षेत्रात आपली बांधिलकी अधोरेखित करण्यासाठी टीकेएमने कामराजर पोर्ट लिमिटेड (केपीएल) सोबत व्हेर्फेज रेट कराराचे नूतनीकरण केले. यामुळे उत्पादन व निर्यात प्रक्रियेला आणखी गती मिळणार आहे.
ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक म्हणून टोयोटा इनोव्हा ब्रँडने भारतात यंदा 20 गौरवशाली वर्षे देखील पूर्ण केली असून, यामुळे 12 लाखांहून अधिक ग्राहकांचा विश्वास कंपनीने जिंकला आहे. तसेच लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही अर्बन क्रूझर टायझर नवीन ब्लूइश ब्लॅक एक्स्टेरिअर कलरमध्ये सादर करण्यात आली. सुरक्षिततेला प्राधान्य देत कंपनीने सर्व व्हेरिएंट्समध्ये 6 एअरबॅग्ज प्रमाणित स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत.
याशिवाय कंपनीने आपल्या आयकॉनिक लक्झरी हायब्रिड इलेक्ट्रिक सेदानचे अधिक गतीशील व स्पोर्टी रूप बाजारात आणले आहे. कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल – स्प्रिंट एडिशन ऑगस्ट महिन्यात सादर करण्यात आले असून, यामध्ये प्रीमियम डिझाइनसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे.