वेस्पा या प्रसिद्ध दुचाकी ब्रँडने आपल्या प्रीमियम ‘प्रिमावेरा १२५’ स्कुटरचे एक नवीन स्पेशल एडिशन मॉडेल सादर केले आहे. इटलीतील प्रसिद्ध आणि अतिशय आलिशान रेस्टॉरंट ग्रुप Gigi च्या सहकार्याने ही स्कुटर तयार करण्यात आली आहे.
सुमारे १०.८ लाख रुपये इतकी प्रचंड किंमत असलेली ही लिमिटेड-एडिशन स्कुटर केवळ रोजच्या येण्या-जाण्यासाठी किंवा प्रवासासाठी नसून, एक ‘लक्झरी लाइफस्टाइल‘ प्रॉडक्ट म्हणून बाजारात आणली गेली आहे. वेस्पाच्या अधिकृत वेबसाइटवरून यासाठी प्री-ऑर्डर सुरू झाली असून ही स्कुटर केवळ युरोपमध्येच विक्रीसाठी उपलब्ध असेल.
‘Gigi’ सोबत खास पार्टनरशिप
ही भागीदारी वेस्पाला उच्चभ्रू आणि लक्झरी लाइफस्टाइल क्षेत्रात अधिक भक्कमपणे स्थापित करते. ‘Gigi’ हा एक अत्यंत प्रसिद्ध इटालियन रेस्टॉरंट समूह आहे, ज्यांचे सेंट-ट्रोपेझ, पॅरिस, रोम, मियामी आणि दुबई यांसारख्या जगातील अतिश्रीमंत ठिकाणांवर आऊटलेट्स आहेत. त्यामुळे ही स्कुटर दैनंदिन प्रवाशांसाठी नसून, या अतिश्रीमंत ठिकाणांना भेट देणाऱ्या ग्राहकांसाठी खास डिझाइन केली आहे.
डिझाइन आणि प्रीमियम फीचर्स
या स्कुटरच्या अगदी प्रत्येक लहान-सहान गोष्टीमधून तिचे खास आणि महागडे असणे स्पष्टपणे दिसून येते,
रंग आणि कोरीव काम: स्कुटरची बॉडी चकचकीत पिवळ्या रंगात फिनिश केली असून, त्यावर क्रोम आणि कॉग्नाक रंगाचे आकर्षण हायलाइट्स दिले आहेत.
आलिशान सीट: यावर आयव्हरी रंगाची लेदर सीट असून त्यावर खास कॉन्ट्रास्ट स्टिचिंग आणि पायपिंग करण्यात आली आहे. स्कुटरचे व्हील्सदेखील आयव्हरी फिनिशमध्ये येतात.
पिकनिक बास्केट: व्यावहारिक लक्झरी दाखवण्यासाठी पुढे लेदर स्ट्रॅप्ससह क्रोम फ्रंट लगेज रॅक आणि मागे क्रोम रॅकवर बसवलेली ‘वेताची पिकनिक बास्केट’ देण्यात आली आहे. या वैशिष्ट्यांमुळे ही स्कुटर नेहमीच्या मास-प्रॉडक्शन वाहनांपेक्षा अगदी वेगळी आणि हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना ठरते.
किंमत आणि उपलब्धता
१२,००० युरो किंमत असलेली ही Primavera 125 x Gigi जगातील इतर कोणत्याही नेहमीच्या १२५cc स्कुटरपेक्षा अत्यंत वेगळ्या श्रेणीत येते. वेस्पाच्या युरोपियन वेबसाइटवरून ही स्कुटर प्री-ऑर्डर करता येईल, परंतु भारत किंवा अमेरिकेत ती लाँच करण्याची सध्या कोणतीही योजना नाही.






