ADAS सिस्टीम म्हणजे काय? फोटो सौजन्य: iStock
तुम्ही कधी ‘ADAS’ या शब्दाबद्दल ऐकले आहे का? किंवा ‘ADAS’ म्हणजे काय, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ADAS चा अर्थ आहे – Advanced Driving Assistance System. हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे जे अलीकडे भारतीय बाजारपेठेतील अनेक नवीन गाड्यांमध्ये उपलब्ध आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी डिझाइन केलेल्या या फीचरचा अनेकदा गैरवापर होताना दिसतो. गाडीचे स्टीअरिंग सोडून व्हिडीओ बनवणाऱ्या चालकांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यात चालक स्टीअरिंग व्हील सोडून गाडी चालवताना दिसतात.
मात्र, ADAS चा खरा उद्देश आणि त्याची कार्यपद्धती या गैरवापरापेक्षा खूप वेगळी आहे. ही सिस्टीम सेन्सर, कॅमेरे आणि रडारच्या मदतीने काम करते. ही सर्व उपकरणे गाडीच्या आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष ठेवतात आणि ड्रायव्हरला अपघात टाळण्यासाठी मदत करतात. चला, या तंत्रज्ञानाचे प्रमुख फायदे आणि ते कसे काम करते, ते जाणून घेऊया.
ADAS तंत्रज्ञान गाडीच्या डोळ्यांसारखे काम करते. ते रस्ते, इतर वाहने आणि अडथळ्यांची माहिती गोळा करते. या माहितीच्या आधारावर, ते ड्रायव्हरला योग्य वेळी सूचना देते किंवा गरज पडल्यास स्वयंचलितपणे कारवाई करते. यामुळे ड्रायव्हरचा ताण कमी होतो आणि ड्रायव्हिंग सुरक्षित होते.