गाडी रस्त्यावर धावण्यास योग्य आहे हे कोण ठरवते?
भारतात कोणतीही नवीन गाडी प्रत्यक्ष रस्त्यावर आणण्यापूर्वी ती सर्व निकषांवर खरी उतरते की नाही, हे तपासण्याची आणि प्रमाणित करण्याची जबाबदारी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या अधिकृत संस्थांकडे असते. यामध्ये प्रामुख्याने ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (ICAT) या संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात.
या संस्थांद्वारे वाहनाची ‘होमोगोलेशन’ म्हणजेच सर्व तांत्रिक तपासणी केली जाते. यामध्ये गाडीचे इंजिन, उत्सर्जनाची पातळी, ब्रेक, दिवे, स्टेअरिंग, टायर आणि इतर सर्व सुरक्षा घटकांची कठोर चाचणी घेतली जाते. सर्व चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झाल्यावरच त्या गाडीला रस्त्यावर धावण्यासाठी कायदेशीर मंजुरी दिली जाते.
भारताची क्रॅश टेस्ट रेटिंग प्रणाली (भारत NCAP) कशी काम करते?
भारताने स्वतःची स्वतंत्र वाहन सुरक्षा मूल्यांकन प्रणाली सुरू केली आहे, ज्याला भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत एनसीएपी) असे म्हटले जाते. ही सिस्टीम पूर्णपणे जागतिक मानकांवर आधारित असून पुढील टप्प्यांत काम करते,
१. प्रौढ प्रवाशांचे संरक्षण: अपघातात मोठ्या माणसांचा जीव किती सुरक्षित राहतो.
२. बाल प्रवाशांचे संरक्षण: लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या यंत्रणा किती प्रभावी आहेत.
३. सुरक्षा साहाय्य तंत्रज्ञान: गाडीमध्ये असणारे एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि सीटबेल्ट रिमाइंडर यांसारखे सुरक्षा फीचर्स.






