लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. विविध वाहिन्यांनी केलेल्या पाहण्यांत तर भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेसला ५२ ते ७४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. अर्थात मतचाचण्यांत काहीही अंदाज वर्तवले असले, तरी कोणताही पक्ष त्यावर विश्वास ठेवायला तयार नसतो. पक्षांनी कोणतीही लढाई मध्येच सोडायची नसते. कार्यकर्त्यांना हुरुप द्यायचा असतो. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी कष्ट घ्यायचे आणि संघटनेनं मात्र काहीच करायचं नाही, यातून अपयशाशिवाय काहीच पदरात पडत नसतं. नेत्यांनी केलेला प्रचार, पक्षाची ध्येयधोरणं लोकांपर्यंत पोचवायची असतात. नेत्यांनी तळागाळापर्यंत संघटनात्मक बांधणी करायची असते. तिच्याकडं लक्ष न दिल्यास कितीही यात्रा काढल्या, तर काहीच फायदा होणार नाही. काँग्रेस संघटनेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी राहुल गांधी ३५० दिवसांनी पुन्हा पदयात्रा काढणार आहेत. काँग्रेसनं या मोर्चाला ‘भारत न्याय यात्रा’ असं नाव दिलं आहे. ईशान्येतील मणिपूर येथून सुरू होणारी ही पदयात्रा मुंबईत संपणार आहे. ६७ दिवसांच्या या यात्रेत राहुल ६२०० दोनशे किलोमीटरची यात्रा करणार आहेत. ‘भारत जोडो’ यात्रा पायी होती. आताची यात्रा तशी वाहनांतून असणार आहे. त्यामुळं पूर्वीच्या यात्रेत जसा जनसंपर्क झाला होता, तसा या वेळच्या यात्रेत होणार नाही. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणं हा यात्रेचा मुख्य उद्देश आहे. १४ राज्यं आणि ८५ जिल्ह्यातून जाणाऱ्या या पदयात्रेचा अधिकृत रोडमॅप काँग्रेसनं अद्याप जाहीर केलेला नाही; मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या यात्रेचा रोडमॅप तयार करण्यात आल्याचं पक्षाच्या सूत्रांचं म्हणणं आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्यात पूर्व ते पश्चिम भारतापर्यंत शंभर जागांचा समावेश असेल, जिथं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान राहुल गांधी आणि कार्यकर्त्यांनी पायी प्रवास केला होता; पण चालण्यासोबतच या यात्रेत हायटेक बसचाही वापर केला जाणार आहे. ‘भारत जोडो’ यात्रेची थीम होती प्रेम आणि सर्वांना एकत्र आणणं. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देणं हा न्याय यात्रेचा विषय आहे. ‘भारत न्याय यात्रे’त केवळ १४ राज्यांचा समावेश केला जाईल. या वेळी वेळ कमी आणि अंतर जास्त आहे. त्यामुळं यात्रेच्या स्वरुपात काही बदल करण्यात आले आहेत.
‘न्याय यात्रे’च्या माध्यमातून काँग्रेसला प्रामुख्यानं चार ईशान्येकडील राज्यांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. या राज्यांमध्ये लोकसभेच्या १९ जागा आहेत. २०१९ मध्ये काँग्रेसनं १९ पैकी चार जागा जिंकल्या होत्या, तर ११ जागांवर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती. या वेळी काँग्रेसला मणिपूर, मेघालय, नागालँड आणि आसाममध्ये उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा आहे. गेल्या वेळी आसाममध्ये काँग्रेस नऊ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यापैकी तीन जागांवर पक्षाचे उमेदवार एक लाखांपेक्षा कमी मतांनी पराभूत झाले. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाममधून यात्रा जोरहाट, नागावमार्गे मेघालयात दाखल होईल. या मार्गानं काँग्रेसला आसाममधील जवळपास नऊ जिल्हे व्यापायचे आहेत. आसाममध्ये काँग्रेसची स्थिती अत्यंत कमकुवत आहे आणि पक्ष गेल्या १० वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. मेघालयानंतर न्याय यात्रा पुन्हा आसाममध्ये प्रवेश करेल आणि धुबरीमार्गे पश्चिम बंगालला जाईल. गेल्या वेळी धुबरीमध्ये काँग्रेस दोन नंबरवर होती. येथून ‘एआययूडीएफ’चे बद्रुद्दीन अजमल विजयी झाले होते. मेघालय-आसामनंतर राहुल गांधींची न्याय यात्रा कूचबिहारमधून पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहे. येथून ही यात्रा जलपाईगुडी आणि सिलीगुडीमार्गे मालदा येथे पोहोचेल. काँग्रेसला न्याय यात्रेद्वारे बंगालमधील किमान आठ जिल्हे व्यापायचे आहेत. २०१९ मध्ये मालदा आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यांतील जागांवर काँग्रेसनं चांगली कामगिरी केली होती. या निवडणुकीत पक्षानं स्वबळावर निवडणूक लढवली होती. यावेळी काँग्रेसची ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेससोबत युती होण्याची शक्यता अजूनही धुसर आहे. त्याचं कारण ममता बॅनर्जी काँग्रेसला दोनपेक्षा जास्त जागा सोडायला तयार नाही. ममता बॅनर्जी यांना काँग्रेसचं वर्चस्व मान्य नाही. त्यातच डाव्यांबरोबर काँग्रेसला युती करायची असेल, तर तृणमूल काँग्रेस डाव्यांना बरोबर घ्यायला तयार नाही आणि डावे ही तृणमूल काँग्रेसबरोबर यायला तयार नाही. २००९ मध्ये काँग्रेसनं तृणमूल काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवली होती. २००९ मध्ये काँग्रेसनं पश्चिम बंगालमध्ये सहा जागा जिंकल्या होत्या. जिंकलेल्या सर्वाधिक जागा मुर्शिदाबाद आणि मालदा येथील होत्या. या वेळीही २००९ प्रमाणंच निकाल लागण्याची आशा पक्षाला आहे. राहुल यांच्या बंगाल दौऱ्याचा मार्गही २००९ मध्ये जिंकलेल्या जागा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. पश्चिम बंगालनंतर राहुल गांधी यांची यात्रा बिहारमध्ये दाखल होणार आहे; मात्रा पश्चिम बंगालमधून निघालेली यात्रा आधी ओडिशा, नंतर छत्तीसगड आणि नंतर झारखंडमार्गे बिहारमध्ये नेण्यात यावी, असं काही नेत्यांचं म्हणणं आहे. राहुल गांधी यांची यात्रा बिहारच्या सीमांचल आणि गंगा पट्ट्यातून गयापर्यंत नेण्याच्या रणनीतीवर काँग्रेस काम करत आहे. २०१९ च्या निवडणुकीत सीमांचलच्या कटिहार, सुपौल आणि पूर्णियामध्ये काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती. पक्षानं किशनगंजची जागा जिंकली होती. या वेळीही पक्ष ‘इंडिया’ आघाडीत याच जागेची मागणी करत आहे. गंगा बेल्टबद्दल बोलायचं तर, काँग्रेसनं मुंगेर मतदारसंघातून शेवटची निवडणूक लढवली होती. तिथं काँग्रेसला तीन लाख ६० हजार मतं मिळाली होती. या वेळी पक्षाची नजर बेगुसराय लोकसभा मतदारसंघावर आहे. काँग्रेसचे कन्हैया कुमार येथून निवडणूक लढवू शकतात.
राहुल गांधींची ‘न्याय यात्रा’ फेब्रुवारीच्या मध्यात झारखंडमध्ये दाखल होणार आहे. झारखंडमध्ये काँग्रेस कोडरमा किंवा चतरा येथून प्रवेश करून राहुल यांची यात्रा जमशेदपूरपर्यंत नेण्याच्या रणनीतीवर काम करत आहे. हजारीबाग, खुंटी आणि रांचीसह आठ जिल्हे व्यापण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. २०१९ मध्ये काँग्रेसनं साच जागांवर निवडणूक लढवली होती, त्यापैकी सहा जागांवर पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता. हजारीबाग, रांची, खुंटी, लोहरदगा या जागांवर काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. झारखंडनंतर काँग्रेसची ‘न्याय यात्रा’ ओडिशात दाखल होणार आहे. राहुल यांच्या न्याय यात्रेद्वारे काँग्रेस ओडिशातील १२ जिल्हे कव्हर करणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून २००९ मध्ये ज्या भागात काँग्रेसनं विजय मिळवला होता, त्या भागांना पुन्हा भेट देतील. त्यात नबरंगपूर आणि कालाहंडी हे प्रमुख आहेत. २००९ मध्ये काँग्रेसनं ओडिशात २१ पैकी सहा जागा जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये हा आकडा एकवर आला. छत्तीसगडमधील बस्तर-सुरगुजाला सामोरं जाण्याची रणनीती फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ओडिशातून राहुल गांधींची यात्रा छत्तीसगडमध्ये दाखल होईल. काँग्रेसला राहुल यांच्या दौऱ्यासाठी तयार करण्यात आलेल्या रोडमॅपमध्ये सुरगुजा आणि बस्तर विभागाचा समावेश करायचा आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या भागात काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. २०१९ मध्येही बस्तर-कोरबा वगळता इतर भागात काँग्रेसला जागा मिळाल्या नाहीत. या वेळी पक्षाला ११ पैकी किमान सहा जागा कोणत्यााही परिस्थितीत जिंकायच्या आहेत. सोनभद्र येथून राहुल गांधींची यात्रा उत्तर प्रदेशात प्रवेश करणार आहे. २००९ च्या लोकसभा जागांच्या आधारे या प्रवासाचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे. राहुल यांची ‘न्याय यात्रा’ उत्तर प्रदेशातील जवळपास १२ जिल्ह्यांतून काढण्याच्या रणनीतीवर काँग्रेस काम करत आहे. या यात्रेच्या माध्यमातून १२ जिल्ह्यांतील १५ जागांवर पक्ष आपला जनाधार मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये उन्नाव, प्रतापगड, अमेठी, रायबरेली या प्रमुख जागांचा समावेश आहे. २००९ मध्ये काँग्रेसनं या जागा जिंकल्या होत्या. या यात्रेच्या माध्यमातून २००९ मध्ये जिंकलेल्या जागेवरही काँग्रेस आपला दावा मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. समाजवादी पक्ष या वेळी काँग्रेसला केवळ आठ-दहा जागा द्यायला तयार आहे. यामागं काँग्रेसची कमकुवत संघटना हे कारण आहे. राहुल गांधींची यात्रा मार्चच्या पहिल्या आठवड्यात मध्य प्रदेशात दाखल होऊ शकते. राहुल यांच्या दौऱ्यातून काँग्रेसला मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर-चंबळ आणि विंध्यमध्ये संघटन मजबूत करायचं आहे. विंध्य आणि ग्वाल्हेर चंबळमध्ये लोकसभेच्या आठ जागा आहेत. गेल्या निवडणुकीत या जागांवर काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता. या वेळी पक्ष नव्या जोमानं इथं यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या नव्या समीकरणांवरून पक्षाला चांगल्या कामगिरीची आशा आहे. ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींनी माळवा आणि निवारवर लक्ष केंद्रित केलं होतं; परंतु माळव्यात काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब होती. निवारमध्येही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा कमी झाल्या. राजस्थान आणि गुजरातमध्ये शून्यातून सावरण्याचं आव्हान आव्हान आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही राज्यात काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या होत्या. दोन्ही ठिकाणी लोकसभेच्या एकूण ५१ जागा आहेत. राहुल गांधी यांचा राजस्थानमधील प्रवास पूर्व राजस्थानमधील बहुतांश जिल्ह्यांमधून जाणार आहे. तिथं विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. गुजरातच्या आठ जागांवरून राहुल गांधींच्या यात्रेच्या रणनीतीवर काँग्रेस काम करत आहे. त्यापैकी वलसाड, बरदौली, छोटा उदयपूर आणि भरूच हे प्रमुख आहेत. २००९ मध्ये काँग्रेसनं वलसाड, बरदौली आणि दाहोद या जागा जिंकल्या होत्या.
मणिपूर येथून निघणारी भारत न्याय यात्रा मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात पोहोचेल. २००९ च्या लोकसभा जागांवर काँग्रेसची नजर आहे. २००९ मध्ये मुंबईत काँग्रेसनं सहापैकी पाच जागा जिंकल्या होत्या. एकावर मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारली होती. २०१९ मध्ये मुंबईत शिवसेनेनं सहापैकी तीन, तर भाजपनं तीन जागा जिंकल्या. २००९ सारखीच कामगिरी करून यात्रेच्या माध्यमातून आघाडीतील अधिक जागांवर आपला दावा मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
– भागा वरखडे
warkhade.bhaga@gmail.com