आजच्या आधुनिक युगात मनुष्य ‘हेल्थ कॉन्शिअस’ झाला आहे. प्रत्येक पदार्थ खाताना, ते खाल्ल्यानंतर किती कॅलेरीस मिळतील त्याचा हिशोब लावला जातो. पण त्याचबरोबर ते खाताना कोणती काळजी घ्यावी हे सुद्धा समजून घेऊ या.
एक सत्य आपल्या सर्वांच्या लक्षात राहावे म्हणून याचा उल्लेख येथे करत आहे. वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला, ज्यामध्ये दोन छोटी झाडे, जी कुंडीमध्ये लावली होती, त्यांना वेगवेगळ्या खोलीत ठेवले. एकसारखा सूर्यप्रकाश, एकी जवळ शास्त्रीय संगीत आणि दुसऱ्या जवळ पाश्चात्य संगीत लावले गेले. आठवडाभर हा प्रयोग केला गेला. त्यानंतरचे निरीक्षण हे होते की, ज्या झाडाजवळ शास्त्रीय संगीत लावले होते, ते झाड टवटवीत आणि फुलांनी बहरलेले दिसले. तर, पाश्चात्य संगीत लावलेले झाड थोडेसे मलूल झालेले दिसले. आणखीन एक प्रयोग केला शिजवलेल्या भातावर. दोन पारदर्शी डब्यांमध्ये शिजवलेला भात ठेवला गेला. तसेच एका डब्यावर लव्ह तर दुसऱ्यावर हेट हे शब्द लिहिले गेले. दोन व्यक्तींना त्या डब्याजवळ जाऊन त्याप्रकारचे विचार मनात आणायला सांगितले. सात दिवस सतत तसे विचार केले गेले. सात दिवसानंतर बघितले तर लव्ह लिहिलेल्या डब्यातला भातावर थोडी हिरवळ बुरशी आली होती.
पण हेट लिहिलेल्या डब्यातल्या भातावर काळी बुरशी आलेली दिसली. तात्पर्य असे की भले झाड असो की पदार्थ; यांवर आपल्या विचारांचा कळत-नकळत परिणाम होतो. म्हणून म्हटले जाते ‘ जसे अन्न, तसे मन आणि जसे मन, तसे अन्न’.
आपल्या जीवनातला अन्न हा सर्वात महत्वाचा आणि गंभीर विषय आहे. कारण आज अन्नामुळे अनेक प्रकारचे आजार होत आहेत. अन्नशुद्धी म्हणजे सात्विक शाकाहारी भोजन, न शिजवलेले स्वच्छ पदार्थ फक्त एवढेच नाही. भाज्या धान्य स्वच्छ धुवून मगच वापरावे पण त्याचबरोबर मनाची शुद्धी ही सुद्धा तितकीच आवश्यक आहे. आपल्या शरीरामध्ये विचारांची स्पंदने बाहेर टाकणारी तीन केंद्रे आहेत. डोळे, हाथ आणि पाय. जेवण बनवण्यासाठी डोळे आणि हाथ यांचा वापर होतो. एखादी व्यक्ती छान स्वयंपाक बनवत असेल तर आपण म्हणतो की ‘हिच्या हाताला चव आहे.’ पण तेच मसाले, तीच कृती वापरून कोणी दुसऱ्याने तोच पदार्थ बनवला तर त्याची चव वेगळी असते. कारण अदृश्यरित्या विचारांचा मसाला ही त्यात पडत असतो. त्याची चव ही जाणवतेच. विचारांची ऊर्जा अपरोक्षरित्या आपल्या शरीरावर आणि मनावरही काम करते.
बाह्यशुद्धीची जसे आपण काळजी घेतो, तसेच आंतरिक शुद्धीवर ही आपण लक्ष ठेवावे. आपण घरामध्ये शिरा बनवतो. हाच पदार्थ देवासाठी बनवला तर तो प्रसाद मानला जातो. घरी बनवला किंवा हॉटेलमध्ये विकला गेला तर त्याला आपण पदार्थ म्हणतो. तीन ही ठिकाणी एकाच पदार्थाचे महत्व वेगळे असते. बनवणाऱ्याची आणि खाणाऱ्यांची भावना ही वेगवेगळी असते. म्हणून स्वयंपाक बनवणे हे एक काम नाही, परंतु फार मोठी जबाबदारी आहे. हृदय परिवर्तनाची सुंदर, प्रेमळ पद्धती म्हणजे अन्न.
आधुनिक युगात हॉटेलमध्ये, रेकडीकर किंवा घरामध्येच स्वयंपाक बनवण्यासाठी आचारी… हे दृश्य दिसते; पण जेवण बनवणाऱ्यांची मानसिकता याच अन्नाद्वारे प्रत्येकाच्या मनावर परिणाम करते, हे सत्य आज आपल्या ध्यानी नाही. एक राजा होता. एके दिवशी त्याच्या राज्यात गुरूंचे आगमन झाले. राजाला मनापासून वाटत होते की आजची रात्र गुरूंनी माझ्या राजवाड्यात भोजन आणि आराम करावा. खूप विनवणी केल्यानंतर गुरूंची स्वीकृती मिळाली. राजाने खूप पाहुणचार केला. पंचपक्वान्ने बनवली गेली. गुरु ही राजावर अत्यंत खुश झाले. गुरूंच्या झोपण्याची व्यवस्था अशा खोलीत केली होती जिथे राजाचा सर्व खजिना ठेवला होता. गुरु जेव्हा त्या खोलीत झोपायला गेले तर त्यांना झोप येईना. वारंवार त्यांना तो खजाना चोरी करण्याचे विचार येऊ लागले. त्या विचारांनी ते हैराण झाले. सकाळ होताच राजाला सांगितले की ‘मला आचाऱ्याला भेटायचे आहे.’
आचाऱ्याबरोबर बोलताना त्यांना समजले की त्या व्यक्तीकडे पैशाची कमतरता असल्यामुळे दिवस-रात्र चोरीचे विचार त्याच्या मनात चालत होते आणि त्याचाच परिणाम की गुरूंना सुद्धा तेच विचार आले. विचार शुद्धी म्हणजेच खरी अन्नशुद्धी. प्रेमाने, शुद्ध विचारांनी, भावनांनी बनवलेले अन्न हे तनाला आणि मनाला पोषक आहार देते. म्हणून स्वयंपाक बनवताना व्यर्थ, नकारात्मक, चिंता, अनेक विचारांचा, शब्दांचा प्रयोग टाळावा. स्वयंपाक घरात शांतता राखावी. विचारांना श्रेष्ठ बनवणारी गीते, भजन अथवा नामस्मरण यांचा उपयोग करावा.
– नीता बेन
bkneetaa24@gmail.com