फोटो सौजन्य - Social Media
जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त बिसलेरी इंटरनॅशनलने महाराष्ट्र आणि गोव्यात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवत प्लास्टिक प्रदूषणाविरोधात जनजागृती करण्याचा व्यापक प्रयत्न केला. कंपनीच्या बॉटल्स फॉर चेंज या मोहिमेअंतर्गत आयोजित कार्यक्रमांमध्ये ४० हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले. मुंबई, पुणे, नागपूर आणि गोवा येथे स्वच्छता मोहीम, प्लास्टिक कचरा संकलन, जनजागृती कार्यक्रम आणि कलात्मक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमांतर्गत नागरिक, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध सामाजिक संघटनांना एकत्र आणण्यात आले. प्लास्टिक कचऱ्याचे वर्गीकरण, संकलन आणि पुनर्वापर याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला. प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करण्यात आली. मुंबईत बिसलेरीने भामला फाऊंडेशनच्या सहकार्याने कार्टर रोड येथे २ हजार वापरलेल्या पीईटी बाटल्यांपासून तयार करण्यात आलेली ‘विंग्स ऑफ चेंज’ ही आकर्षक कलाकृती साकारली. पुनर्वापर आणि सर्क्युलर इकॉनॉमीचे महत्त्व अधोरेखित करणारी ही कलाकृती पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देणारी ठरली. या कलाकृतीकडे नागरिकांनी विशेष आकर्षणाने पाहिले.
बिसलेरी इंटरनॅशनलचे सस्टेनेबिलिटी आणि कॉर्पोरेट अफेअर्स विभागाचे संचालक के. गणेश यांनी यावेळी सांगितले की, पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक सहभाग अत्यंत आवश्यक आहे. *बॉटल्स फॉर चेंज* उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू असून प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्वापराला चालना देण्यासाठी विविध स्तरांवर सातत्याने काम केले जात आहे.
ठाणे, नवी मुंबई आणि मिरा रोड परिसरात घरोघरी जाऊन राबवलेल्या मोहिमांमधून ३५ हजारांहून अधिक नागरिकांपर्यंत प्लास्टिक वर्गीकरण आणि पुनर्वापराचा संदेश पोहोचवण्यात आला. तसेच मिरा रोड येथे जनजागृती स्टॉल्स उभारण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी रिसोर्स रिकव्हरी अँड सस्टेनेबिलिटी इन्स्पिरेशन सेंटरच्या मार्गदर्शित भेटींचे आयोजन करून प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर कसा होतो याची माहिती देण्यात आली.
पुण्यात विविध कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक समुदायांच्या सहभागातून जनजागृती आणि प्लास्टिक संकलन मोहिमा राबविण्यात आल्या. या उपक्रमांमध्ये ४,५०० पेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले. याशिवाय SCERT आणि इतर भागीदारांच्या सहकार्याने राबवलेल्या मोहिमांमधून ७५० किलोहून अधिक प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.
नागपूरमध्ये समाजाभिमुख उपक्रम आणि वॉकर्स स्ट्रीटवरील विशेष स्टॉलद्वारे १,५०० हून अधिक नागरिकांपर्यंत प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचा संदेश पोहोचवण्यात आला. तर गोव्यात पणजी आणि हरवळे येथे आयोजित स्वच्छता मोहिमांमध्ये २०० हून अधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. बिसलेरीच्या बॉटल्स फॉर चेंज या उपक्रमाने आतापर्यंत देशभरातील १ कोटींहून अधिक लोकांपर्यंत पोहोच साधली आहे. प्लास्टिक वर्गीकरण, संकलन आणि पुनर्वापराबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम सातत्याने कार्यरत असून पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक सहभागाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करत आहे.






