(फोटो- सोशल मिडिया)
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) ने भारतातील स्टील आणि इतर संबंधित कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज परिसंस्थेचा विकास आणि वृद्धी करण्यासाठी ‘स्टील युजर्स फेडरेशन ऑफ इंडिया’ म्हणजेच सुफीसोबत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
या भागीदारीचे उद्दिष्ट भारतीय स्टील उद्योगातील घटकांसाठी एक भक्कम, पारदर्शक आणि कार्यक्षम मूल्य-जोखीम व्यवस्थापन प्रणाली तयार करणे हे आहे, ज्यामुळे त्यांना एक्स्चेंज-ट्रेडेड डेरिव्हेटिव्ह्जच्या माध्यमातून किमतींमधील चढ-उतारांपासून स्वतःचा बचाव करता येईल. या उपक्रमाचा फायदा स्टील उत्पादक, प्रक्रिया उद्योग, एमएसएमई (MSMEs), ओईएम (OEMs), पायाभूत सुविधा कंपन्या आणि अंतिम ग्राहक यांसारख्या विविध स्टेकहोल्डर्स मिळण्याची दाट शक्यता आहे.
या सामंजस्य करारांतर्गत, भारतातील स्टील आणि इतर संबंधित कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज उत्पादनांचा यशस्वी विकास करण्यासाठी ‘एनएसई’ आणि ‘सुफी’ हे उत्पादन डिझाइन, मार्केट आउटरीच, उद्योग सल्लामसलत, क्षमता बांधणी आणि जनजागृती मोहिमांवर एकत्रितपणे काम करतील.
भारत हा जगातील स्टीलच्या सर्वात मोठ्या उत्पादक आणि ग्राहकांपैकी एक आहे. ऑटोमोबाईल्स, इंजिनिअरिंग, पायाभूत सुविधा, कॅपिटल गुड्स आणि ग्राहक उपयोगी वस्तू (कंझ्युमर ड्युरेबल्स) यांसारख्या क्षेत्रांमध्ये स्टीलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. प्रस्तावित करारामुळे देशांतर्गत स्टील मूल्य साखळीतील (व्हॅल्यू चेन) घटकांना हेजिंगची एक प्रभावी यंत्रणा उपलब्ध होईल आणि पारदर्शक किंमत निश्चिती प्रक्रियेला (प्राईस डिस्कव्हरी) बळ मिळेल अशी अपेक्षा आहे.
“भारतीय स्टील उद्योग आता लक्षणीयरीत्या परिपक्व झाला असून, पारदर्शक आणि कार्यक्षम जोखीम व्यवस्थापन साधनांची (रिस्क मॅनेजमेंट टूल्स) गरज दिवसेंदिवस वाढते आहे. ‘सुफी’सोबतचे आमचे सहकार्य हे भारतीय स्टील बाजारपेठेतील घटकांच्या हेजिंगविषयक गरजा पूर्ण करणारे विश्वासार्ह आणि लिक्विड डेरिव्हेटिव्ह्ज कंत्राट तयार करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. उद्योगाच्या बदलत्या गरजांनुसार नाविन्यपूर्ण कमोडिटी डेरिव्हेटिव्ह उत्पादने विकसित करण्यासाठी एनएसई कटिबद्ध आहे.”
हा सामंजस्य करार भारतातील कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज बाजारपेठ आधुनिक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी ‘एनएसई’ आणि ‘सुफी’ यांच्यातील सामायिक वचनबद्धता दर्शवतो.






