(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने NRAI भारतीय स्पर्धा आयोगाला आवाहन केले आहे. चालू असलेल्या मक्तेदारीविरोधी खटल्याच्या निकालापर्यंत झोमॅटोला किंमत समानता आणि विशिष्ट हक्कांची कलमे लागू करण्यापासून तात्काळ थांबवावे. NRAI ने २०२१ मध्ये भारतीय स्पर्धा आयोगाकडे दाखल केलेल्या या प्रलंबित खटल्यात, झोमॅटोवर भेदभावपूर्ण धोरणे, किंमतींमधील असमानता आणि माहिती लपवल्याचा आरोप आहे.
नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन NRAI चे म्हणणं आहे की, झोमॅटोच्या ‘प्राइस-पॅरिटी’ नियमामुळे रेस्टॉरंट्सना इतर प्लॅटफॉर्मवर त्यांच्या पदार्थांच्या किमती वाढवाव्या लागतात आणि झोमॅटो त्यांना स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरही कमी किमतीत अन्न विकण्याची परवानगी देत नाही. झोमॅटो रेस्टॉरंट्सना इतर ॲप्स न वापरता, फक्त स्वतःशीच कनेक्ट राहण्यासही सांगते.
झोमॅटो फुड ऑर्डर करणाऱ्या ग्राहकाची ओळखही लपवते, ज्यामुळे रेस्टॉरंट्सना ग्राहकांशी थेट संवाद साधता येत नाही. एका सरकारी चौकशीत झोमॅटोला दोषी ठरवण्यात आले आहे, परंतु अंतिम निकाल अद्याप प्रलंबित आहे. अंतिम निकाल लागेपर्यंत झोमॅटोला आपल्यावर दबाव टाकण्यापासून रोखावे, अशी मागणी रेस्टॉरंट मालक करत आहेत.
रेस्टॉरंट असोसिएशनचे म्हणणे आहे की, झोमॅटोने यापूर्वी महासंचालक आणि आयोगाला सांगितले होते की त्यांनी ही प्रथा बंद केली आहे. त्यामुळे कार्यवाही पूर्ण होईपर्यंत त्यांनी आपल्या शब्दावर ठाम राहावे आणि कोणत्याही दबावाला बळी पडू नये. २०२२ पासून सुरू असलेल्या चौकशीत, महासंचालकांना असे आढळले की झोमॅटोच्या ‘एक्सक्लुझिव्हिटी कंडिशन्स’ आणि ‘वाइड प्राइस पॅरिटी’ या कलमांनी स्पर्धा कायदा, २०२२ च्या कलम ३(४) चे उल्लंघन केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ जुलै रोजी होणार आहे.
झोमॅटोने आपल्या शब्दावरून मागे हटू नये. ‘बिझनेस स्टँडर्ड’शी बोलताना, NRI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, झोमॅटोला आपल्या शब्दावरून मागे हटण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. झोमॅटोने महासंचालक आणि आयोगाला सांगितले होते की त्यांनी वादग्रस्त प्रथा बंद केल्या आहेत किंवा काढून टाकल्या आहेत, त्यामुळे कार्यवाही सुरू असताना झोमॅटोने आपल्या शब्दावर ठाम राहावे आणि त्या नियमांचे पालन करणे सुरू ठेवावे. CCI कडे दाखल केलेल्या अर्जात, NRAI ने नियामकाला आवाहन केले आहे की झोमॅटोला सुनावणी पुढे ढकलण्यासाठी आणखी वेळ देऊ नये.






