शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जवाहर बालभवन महत्त्वाची भूमिका बजावत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारची केंद्रे उभारण्याचा प्रयत्न केला जाईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
मुंबईतील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनचा 73 वा वर्धापन दिन सोमवारी साजरा झाला. या कार्यक्रमाला राज्यमंत्री डॉ. भोयर उपस्थित होते. त्यांच्यासह बालभवनचे अशासकीय सदस्य प्रशांत भामरे, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, जवाहर बालभवनच्या संचालक नीता पाटील, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आणि विद्यार्थी उपस्थित होते.
राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मित असणे हा शालेय शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. यासाठी शिक्षण आनंददायी असण्यावर राज्य शासनाचा भर आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास व्हावा या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. 73 वर्षांपूर्वी स्थापन झालेले जवाहर बालभवन हेच कार्य अतिशय उत्तमरितीने पार पाडीत असून विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, खेळ, विविध छंद यामध्ये मिळविलेले नैपुण्य पाहता आणि याद्वारे त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे स्मित पाहता ही इमारत उभारण्यामागील उद्देश सफल झाल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच आपली आवड जोपासता यावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बालभवनसारखे केंद्र उभारण्याचा आपला प्रयत्न राहील, असे ते म्हणाले.
यावेळी राज्यमंत्री डॉ. भोयर यांच्या हस्ते बालभवनच्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम, बालगीत, आदिवासी कोरकू नृत्य आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या या सादरीकरणामुळे बालभवनमध्ये घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा ठसा उमटला.
बालभवनच्या संचालक नीता पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये बालभवन स्थापनेचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, “आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे” या ब्रीदवाक्याने प्रेरित होत जवाहर बालभवन गेली ७३ वर्षे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना केवळ शालेय शिक्षणापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या अंगभूत कलागुणांना विकसित करण्यासाठी विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवले जातात. वर्षभर घेण्यात येणाऱ्या छंद शिबिरांमधून, गायन-नृत्य प्रशिक्षणातून आणि विविध कार्यशाळांमधून विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी धार प्राप्त होते.
राज्यभरातील विद्यार्थ्यांना अशा सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व जिल्ह्यांत बालभवनसारखी केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थी शालेय शिक्षणासोबतच त्यांच्या कलागुणांना वाव देऊ शकतील आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास डॉ. भोयर यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढून त्यांना शिक्षणासोबतच त्यांच्या कलेमध्ये प्रावीण्य मिळवण्याची संधी उपलब्ध होईल.