फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Arihant Academy Support for Mahesh Tutorials students 2026: नुकतेच अरिहंत अकॅडमी लिमिटेडने जाहीर केले आहे की, ते महेश ट्युटोरियल्सच्या (एमटी एज्युकेअर लिमिटेड) पात्र विद्यार्थ्यांना अध्ययन प्रवासात सातत्य राखण्यासाठी शैक्षणिक पाठबळ देणार आहेत. अरिहंतसाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित सर्वोपरी आहे आणि म्हणून त्यांनी कोणतीही अतिरिक्त फी न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी असे स्पष्ट केले आहे की विद्यार्थी त्यांच्या कोर्सेससाठी केवळ उर्वरित फी भरतील.
अरिहंत अकॅडमी लागू असलेल्या प्रवेश धोरणांच्या अधीन राहून मुंबई महानगर क्षेत्रातील निवडक अरिहंत अकॅडमी शाखांमध्ये महेश ट्युटोरियल्सच्या विद्यार्थ्यांना सामावून घेऊन योग्य कोचिंगचे पाठबळ देईल. या पाठबळाचा फायदा इयत्ता ८ वी ते १० वी, ११ वी आणि १२ वी मध्ये शिकणाऱ्या जवळपास १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मिळण्याची अपेक्षा आहे.
अखंडित शैक्षणिक तयारीचे महत्त्व ओळखून, विशेषतः बोर्ड परीक्षा आणि स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी अरिहंत अकॅडमीच्या अभ्यासक्रम सहाय्याचा उद्देश विद्यार्थ्यांना कोणत्याही अडथळ्याविना त्यांचा अभ्यास सुरू ठेवण्यास मदत करणे हा आहे. सुव्यवस्थित कोचिंग, अनुभवी शिक्षक आणि प्रस्थापित शैक्षणिक चौकटीत प्रवेश देऊन अरिहंत अकॅडमी सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करत आहे की, विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाच्या या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात त्यांच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करतील.
अरिहंत अकॅडमी लिमिटेडचे संस्थापक आणि संचालक अनिल कपासी म्हणाले, “महेश ट्युटोरियल्ससमोरील व्यावसायिक अडचणींनंतर तेथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची माहिती जेव्हा आम्हाला मिळाली, तेव्हा विद्यार्थ्यांचे शिक्षण शक्य तितक्या कमी अडथळ्यांसह सुरू राहावे, ही आमची सर्वात पहिली प्राथमिकता होती. तसेच त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या अकॅडमीचे पूर्ण लक्ष विद्यार्थ्यांना आश्वासक अध्ययन वातावरण, शैक्षणिक मार्गदर्शन आणि आवश्यक ते सातत्य मिळवून देण्यावर असेल, ज्यामुळे ते आत्मविश्वासाने आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकतील.”






