( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Shubha Godbole Cancer: मराठी मनोरंजनविश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वी कॅन्सरशी सुरू असलेल्या त्यांच्या लढ्याबद्दल खुलासा केला होता. त्यानंतर आता लोकप्रिय अभिनेत्री शुभा गोडबोले यांनाही गेल्या वर्षी कॅन्सरचं ( cancer) निदान झाल्याचं समोर आलं आहे.’अग्गबाई सुनबाई’, ‘जाऊ नको दूर बाबा’, ‘दुर्गा’, ‘ट्रान्स अफेअर’ आणि ‘तुझेच मी गात आहे’ यांसारख्या मालिका व नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेत्री शुभा गोडबोले या गेल्या वर्षभरापासून कॅन्सरवर उपचार घेत आहेत. केमोथेरपीमुळे शुभा गोडबोले यांचे सर्व केस गळून गेले. मात्र, या बदलामुळे खचून न जाता त्यांनी तो सकारात्मकतेने स्वीकारला. नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर नव्या लूकमधील काही फोटो शेअर करत आयुष्यातील या कठीण टप्प्याकडेही आत्मविश्वासाने पाहण्याचा संदेश दिला.
कॅन्सरवरील उपचारांनंतर आयुष्यात आलेल्या नव्या बदलांचा स्वीकार करत अभिनेत्री शुभा गोडबोले यांनी सोशल मीडियावर एक मनाला भिडणारी पोस्ट शेअर केली आहे. केमोथेरपीनंतर पुन्हा आलेल्या केसांबद्दल त्यांनी अत्यंत मोकळेपणाने अनुभव मांडला असून, या बदलाकडे सकारात्मक नजरेने पाहण्याचं आवाहनही केलं आहे.
पोस्टमध्ये शुभा लिहितात, “माझे नवीन कुरळे केस माझ्या आधीच्या केसांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. गुगलवर शोध घेतल्यानंतर कळलं की केमोथेरपीनंतर येणाऱ्या या कुरळ्या केसांना ‘केमो कर्ल्स’ म्हणतात.” त्या पुढे सांगतात की, उपचारानंतर पुन्हा येणारे केस अनेक रुग्णांमध्ये कुरळे असतात. काहींचे केस कालांतराने पूर्वीसारखे होतात, तर काहींचे कायम तसेच राहतात.

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
त्यांनी पुढे लिहिले. “बहुतेक माझे ‘केमो कर्ल्स’ आता कायमचेच राहणार आहेत! अजूनही मला ठरवता येत नाही की आधीचे केस जास्त आवडतात की हे नवीन कुरळे केस,” असं त्यांनी मिश्कील अंदाजात लिहिलं.
शुभा गोडबोले यांच्या या पोस्टने केवळ त्यांच्या चाहत्यांनाच नाही, तर कॅन्सरशी लढणाऱ्या अनेक रुग्णांनाही नवी प्रेरणा दिली आहे. आजारामुळे होणारे शारीरिक बदल हे लाज वाटण्यासारखे नसून, ते धैर्याने स्वीकारण्याची गरज आहे, हा संदेश त्यांनी आपल्या अनुभवातून दिला. त्यांच्या या सकारात्मक दृष्टिकोनाचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून, चाहते आणि सहकलाकार त्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देत आहेत.






