धक्कादायक ! वाढदिवशीच सासरच्या मंडळींनी केली जावयाची हत्या; बॅटसह काठीने केला हल्ला
नागपूर : संपत्तीच्या वादातून सासरच्या नातेवाईकांनी जावयाला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली. ही धक्कादायक घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. विशेष म्हणजे, अभिषेकचा वाढदिवस असतानाच त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. अभिषेक गुड्डूड धुर्वे (वय ३०, रा. वैष्णवदेवीनगर) असे मृताचे नाव आहे.
याप्रकरणी दीनानाथ कल्लूराम निर्मलकर (वय ३२), संतोष गोवर्धन गायगुवाल (वय ५०) आणि लक्ष्मी लालाजी पटेल (वय ५५, सर्व रा. पांडुरंगनगर, कळमना) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दीनानाथ आणि संतोष यांना पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मी जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेकची आजी सासू तुलसीबाई गायगुवाल (वय ७०) या पांडुरंगनगर येथे राहतात. त्या रेल्वेतून निवृत्त झाल्या असून त्यांना पेन्शन मिळते. त्यांना दोन मुली आणि तीन मुले आहेत.
अभिषेक हा त्यांच्या नाती आंचलचा पती होता. तुलसीबाई यांचे घर आणि पैशांवर सर्वांचा डोळा होता. जो तुलसीबाईचे पालन-पोषण करत होता. त्याला पेन्शनचे पैसेही मिळत होते. काही महिन्यांपूर्वी अभिषेक त्यांना आपल्या घरी घेऊन गेला होता. तुलसीबाईंनी मालमत्ता विकून सर्व वारसांना वाटणी करून द्यावी, अशी त्याची भूमिका होती. मात्र, इतर नातेवाईक त्याला विरोध करत असल्याने कुटुंबात सतत वाद होत होते.
ठाण्यात अचानक खालावली प्रकृती
रविवारी अभिषेकचा वाढदिवस होता. घरी वाढदिवस साजरा केल्यानंतर रात्री ११ वाजता तो तुलसीबाई यांच्या घरी गेला. तेथे पुन्हा मालमत्तेच्या वाटणीच्या मुद्द्यावरून वाद झाला. शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी अभिषेकवर क्रिकेट बॅट, काठी आणि टिकासने हल्ला केला. अभिषेकनेही प्रतिकार केला. या झटापटीत अभिषेक आणि लक्ष्मी दोघेही जखमी झाले. त्यानंतर दोन्ही बाजू कळमना पोलिस ठाण्यात पोहोचल्या. प्रकृती अचानक खालावल्याने त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले.






