फोटो सौजन्य- सोशल मीडिया
CBSE 12th result controversy 2026: सीबीएसईने यावर्षी इयत्ता १२ वीच्या उत्तरपत्रिका डिजिटल प्रक्रिया म्हणजेच ऑन स्क्रीन मार्किंग (OSM) सिस्टिमद्वारे चेक केली आहे. परंतु, निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्ड वादाच्या भावऱ्यात सापडले आहे. ओएसएम प्रणालीतील त्रुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. आशा परिस्थितीत आणखी एक प्रकरण सौदी अरेबियातून समोर आले आहे. येथे राहणाऱ्या विद्यार्थ्याने नोंदवले आहे की, परीक्षेच्या निकालात मिळालेल्या त्यांच्या मार्कशीटवर विषयानुसार गुण नोंदवले गेले नव्हते. याविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. मात्र, हे प्रकरण आशा वेळी समोर आले आहे की, जेव्हा पश्चिम आशियातील परीक्षा रद्द झाल्यामुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसईने विशेष मूल्यापन व्यवस्था लागू केली होती.
सौदी अरेबियातील या विद्यार्थ्यांने नोंदवलेल्या याचिकेवर १२ जून २०२६ रोजी सुनावणी होणार आहे. परंतु, असे पहिल्यांदाच घडलेले नाही. भारतातही अनेक विद्यार्थी आहेत, ज्यांनी त्यांना मिळालेल्या मार्कशीटवर गुण दिले नसल्याची तक्रार नोंदवली होती. दिल्लीत राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने गुण नसलेली मार्कशीट आणि कोरी उत्तरपत्रिका मिळाल्याची तक्रार सीबीएसईकडे केली होती.
यानंतर एक प्रकरण मेरठमधून समोर आले होते. येथे काही विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर जास्त गुण देण्यात आले तर काही विद्यार्थ्याच्या मार्कशीट आणि उत्तरपत्रिकेवरील गुणामध्ये तफावत पहायला मिळाली. तसेच इयत्ता १२ वीच्या अनेक विद्यार्थ्यांनी फिजिक्स (भौतिकशास्त्र) पेपरच्या चुकीच्या तपासणीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. बोर्डाने फिजिक्सच्या उत्तरपत्रिका योग्य पद्धतीने तपासल्या नसल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. इतकेच नव्हे, तर अनेकांना एका विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका दुसऱ्याच विद्यार्थ्याला मिळण्यासारख्या गंभीर समस्यांचाही सामना करावा लागला. या अनेक प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या तक्रारीमुळे सीबीएसई्च्या मुल्यांकन प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






