फोटो सौजन्य- सोशल मीडिया
CBSE Class 12 Answer Sheet Scanned Copy 2026: CBSE ने इयत्ता १२ वीच्या बोर्ड परीक्षेला बसलल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. बोर्डाने स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मिळवण्याची अंतिम तारिख वाढवली आहे. पूर्वी, ही सुविधा २४ मे २०२६ पर्यंत उपलब्ध होती. परंतु, आता ती २५ मे २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना स्कॅन कॉपी हवी असेल, त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
CBSE चा हा निर्णय अशा विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक आहे. जे आपल्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीबाबत संतुष्ट नाहीत. असे अनेक विद्यार्थी आपल्याला गुण कुठे कमी पडले हे पाहू शकतील. तसेच उत्तरपत्रिकांच्या तपासणीबाबत कोणतीही शंका असल्यास त्या उत्तरांची पुनर्मूल्यांकन करण्यासाठी अर्ज करू शकतील. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजून घेण्यास आणि भविष्यात अधिक चांगली तयारी करण्यास मदत होईल, असे तज्ञांचे मत आहे.
CBSE ने आपल्या नोटीसमध्ये सांगितले की, री-इव्हॅल्युएशन म्हणजेच पुनर्मूल्यांकनाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका उपलब्ध करून दिल्यानंतर पुनर्मुल्यांकनाचे पोर्टल किमान दोन दिवस खुले राहील, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपली उत्तरपत्रिका पाहिल्यावर निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. तसेच ज्या विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे, ते वेळेत अर्ज करू शकतात.
सीबीएससी बोर्डाने विद्यार्थ्यांना सांगितले आहे की, त्यांनी केवळ अधिकृत वेबसाईटद्वारे जारी केलल्या माहितीवरच विश्वास ठेवावा. तसेच त्यांना सोशल मीडिया किंवा बनावट नोटिसींपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
CBSE चे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, विदयार्थ्यांची सोय लक्षात घेऊन ही मुदत वाढवण्यात आली आहे. तसेच ही सुविधा सर्व विद्यार्थ्यांमध्ये विश्वसनीयता निर्माण करणारी आणि बोर्डाच्या पारदर्शक परीक्षा प्रणालीचा एक भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. आता विद्यार्थी २५ मे च्या रात्रीपर्यंत अर्ज करू शकतात. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल.






