फोटो सौजन्य - Social Media
नीता परब : State Common Entrance Test Cell Maharashtra कडून दुसऱ्या संधीच्या सीईटीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीची ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. एमबीए/एमएमएस तसेच MHT CET पीसीएम आणि पीसीबी गटांच्या परीक्षा ९ ते २१ मे २०२६ दरम्यान आयोजित करण्यात येणार आहेत. या दुसऱ्या संधीच्या परीक्षेला राज्यभरातून तब्बल ४ लाख ९२ हजार ३८३ विद्यार्थी बसणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पहिल्या सत्रातील परीक्षांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. एकूण ८ लाख ९६ हजार २३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ८ लाख ३३ हजार ४८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामुळे ९२.९९ टक्के उपस्थिती नोंदवली गेली, तर ६२ हजार ७५४ विद्यार्थी अनुपस्थित राहिले होते. या आकडेवारीवरून सीईटी परीक्षेचे वाढते महत्त्व अधोरेखित होते.
यावर्षी प्रथमच सीईटी कक्षाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. काही प्रमुख व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा प्रवेश परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना किमान एक परीक्षा देणे अनिवार्य असून, दुसरी परीक्षा देणे ऐच्छिक ठेवण्यात आले आहे. अर्ज करतानाच विद्यार्थ्यांनी एक किंवा दोन परीक्षा देण्याचा पर्याय निवडलेला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, जर विद्यार्थ्याने दोन्ही संधींच्या परीक्षा दिल्या असतील, तर त्यातील ज्या परीक्षेत जास्त पर्सेंटाइल मिळाले असेल, तो निकाल अंतिम प्रवेशासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपली कामगिरी सुधारण्याची आणि अधिक चांगला निकाल मिळवण्याची अतिरिक्त संधी उपलब्ध झाली आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा ठरत असून स्पर्धा परीक्षांच्या तयारीत अधिक आत्मविश्वास निर्माण करणारा आहे.






