चिपळूणमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वागताऐवजी कष्ट; विद्यार्थिनींना उचलावी लागली लोखंडी कपाटे
चिपळूण शहरातील बापट आळी परिसरातील कन्याशाळेत हा प्रकार घडला. शाळेच्या वर्गखोल्यांच्या दुरुस्ती आणि डागडुजीचे काम एका ठेकेदाराकडे देण्यात आले होते. संबंधित काम पूर्ण झाल्यानंतरही वर्गखोल्यांमध्ये बांधकाम साहित्य, अडगळ आणि अस्वच्छता तशीच पडून होती. यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांनी संबंधित ठेकेदाराला वारंवार साफसफाई आणि साहित्य हटवण्याची विनंती केली होती. मात्र, शिक्षकांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत ठेकेदाराने कोणतीही कार्यवाही केली नाही. अखेर शाळा सुरू होण्याचा दिवस उजाडला आणि वर्गखोल्या वापरण्यायोग्य नसल्याचे चित्र दिसून आले. विद्यार्थिनींच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून शिक्षकांनी स्वतः पुढाकार घेत वर्गांमधील कौले आणि इतर साहित्य हटवण्याचे काम सुरू केले.
चिपळूण बसस्थानकाचे काम पुढील वर्षी पूर्ण होणार, अतिरिक्त निधीचीही तयारी; प्रताप सरनाईक यांची ग्वाही
याचदरम्यान, वर्गखोल्यांमध्ये असलेली अवजड लोखंडी कपाटे हलवण्याची वेळ आली. धक्कादायक बाब म्हणजे ही कपाटे हलवण्यासाठी विद्यार्थिनींची मदत घेण्यात आली. पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींना अंगमेहनतीची आणि संभाव्य धोकादायक कामे करावी लागल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पालक, नागरिक आणि शिक्षणप्रेमींमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. येथील शिक्षकांनी शेवटी स्वतः अंगमेहनत करून त्या वर्गखोल्यांमधील ठेवलेली कौले व अन्य साहित्य अन्यत्र हलविले. यानंतर याठिकाणी असणारी अवजड लोखंडी कपाटे चक्क विद्यार्थिनींना उचलावी लागली. पहिल्या दिवशी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत होण्याऐवजी त्यांना अंगमेहनतीचे काम करावे लागले. ठेकेदाराच्या अनागोंदीचा फटका या विद्यार्थिनींना बसला.
पालकांकडून शाळा प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराविरोधात नाराजी व्यक्त केली जात असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड केल्याचा आरोप केला जात आहे. शाळेत सुरू असलेल्या डागडुजीच्या कामांमध्ये योग्य नियोजनाचा अभाव आणि ठेकेदाराच्या अनागोंदीमुळे निष्पाप विद्यार्थिनींना याचा फटका बसल्याची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणी शिक्षण विभागाने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.






