फोटो सौजन्य- सोशल मीडिया
New Army Chief Dheeraj Seth: देशाला लवकरच नवे लष्करप्रमुख (Army Chief) मिळणार आहेत. जनरल उपेंद्र द्विवेदी ३० जून २०२६ रोजी आपला कार्यकाळ पूर्ण करून निवृत्त होत असून त्यांच्या जागी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते देशाचे ४९ वे उप-लष्करप्रमुख (Vice Chief of Army Staff) म्हणून कार्यरत असून, ३० जून रोजी ते ३१ वे लष्करप्रमुख म्हणून भारतीय सैन्याची कमान हाती घेतील. विशेष म्हणजे, त्यांचा हा कार्यकाळ ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत असणार आहे. यानिमित्ताने PVSM, UYSM आणि AVSM यांसारख्या मोठ्या लष्करी सन्मानांनी गौरवल्या गेलेल्या धीरज सेठ यांचा शिक्षणापासून ते लष्करप्रमुख पदापर्यंतचा प्रवास जाणून घेऊया.
लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या शिक्षण आणि प्रशिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी देशातील अनेक नामांकित आणि प्रतिष्ठित लष्करी संस्थांमधून शिक्षण पूर्ण केले आहे. यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला, इंडियन मिलिट्री अकॅडमी डेहराडून, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन, आर्मी वॉर कॉलेज महू ,नॅशनल डिफेन्स कॉलेज नवी दिल्ली सारख्या शैक्षणिक संस्थांचा समावेश होतो. २० डिसेंबर १९८६ रोजी ‘आर्म्ड कोर’ (Armoured Corps) मध्ये कमिशन मिळाल्यापासून आतापर्यंत त्यांनी भारतीय सैन्यात जवळपास चार दशके (४० वर्षे) सेवा बजावली आहे.
आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी डेझर्ट सेक्टरमध्ये आर्म्ड रेजिमेंटचे नेतृत्व केले आहे. तसेच त्यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये (Counter-Insurgency Operations) सक्रिय सहभाग नोंदवला असून अंगोला देशातील संयुक्त राष्ट्रांच्या (UN) शांतता मोहिमेत ‘ऑपरेशन ऑफिसर’ म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. या संपूर्ण प्रवासात त्यांनी कमांड, स्टाफ आणि ट्रेनिंग या तिन्ही आघाड्यांवरील अत्यंत महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांचे भारतीय लष्कराशी असलेले नाते नवीन नाही, तर हा त्यांच्या घराण्याचाच परंपरागत वारसा आहे. त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल कृष्ण मोहन सेठ हे देखील भारतीय सैन्यात उच्च पदावर कार्यरत होते आणि १९९७ मध्ये ‘अॅडज्युटंट जनरल’ (Adjutant General) पदावरून निवृत्त झाले होते. देशासाठी बजावलेल्या उत्कृष्ट आणि शौर्यपूर्ण सेवेसाठी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांना देशाच्या सर्वोच्च लष्करी पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. ३० जून रोजी ३१ वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर, त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कर आधुनिकता आणि सुरक्षेच्या नव्या शिखरांवर पोहोचेल यात शंका नाही.






